28 Percent GST on Online Gaming: ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो तसेच घोड्यांच्या शर्यतींवर 28 टक्के जीएसटी लावण्याबाबत मागील काही महिन्यांपूर्वी सरकारने प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर सरकार ठाम राहिले असून उद्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून यावर 28 टक्के जीएसटी आकारण्याचा सरकारने निर्णय घेतल आहे. याबाबतचे परिपत्रिक सरकारने प्रसिद्ध केले.
केंद्रीय अप्रत्यक्ष टॅक्स आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष (Central Board of Indirect Taxes and Customs - CBIC) संजय कुमार अग्रवाल यांनी सीएनबीसी आवाज या वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. सरकारने ऑनलाईन गेम, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतींवर जीएसटी आकारताना यांचा Betting, Gambling आणि Lottery या कॅटेगरीमध्ये समावेश केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील आणि परदेशातील अनेक गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली. ऑनलाईन गेमवर 28 टक्के जीएसटी लावल्यामुळे या इंडस्ट्रीचं जवळपास 2.5 अब्ज डॉलरचं नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.
18 टक्क्यांवरून 28 टक्के जीएसटी
आतापर्यंत सरकार ऑनलाईन गेम उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांकडून 18 टक्के जीएसटी आकारत होती. आता या कंपन्यांना 28 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यासंदर्भात जीएसटी संचालनालयाने यापूर्वीच काही कंपन्यांना जीएसटी भरत नसल्या संदर्भात नोटीस पाठवल्या आहेत.
ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीमधील गुंतवणूक येत्या 3 ते 4 वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणारआहे. या इंडस्ट्रीमधील गुंतवणूक जवळपास 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावर आता 28 टक्के जीएसटी आकारला जाणार असेल, या गुंतवणुकीवर नक्कीच विपरित परिणाम होऊ शकतो.
बक्षिसावर नो जीएसटी
ऑनलाईन गेम, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊन जिंकलेल्या रकमेवर जीएसटी लावला जाणार नसल्याचे यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन गेम खेळताना त्यासाठी भरलेल्या फीवर किंवा रकमेवर जीएसटी आकारला जाणार आहे.