मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. मात्र, यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठीच्या पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे. गहू आणि आट्याच्या भावावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, लवकरच भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे संजीव चोप्रा म्हणाले.
आट्याचा दर 38 रुपये किलो (Atta rate 38 Rs kg)
किरकोळ बाजारातील गव्हाचा दर 2 हजार रुपये क्विंटल पासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. विविध प्रजातीच्या गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. तसचे आट्याचा दर 38 रुपये किलो इतका झाला आहे. भाववाढ रोखण्यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याबाबत चोप्रा यांनी माहिती दिली नाही.
FCI गोदामात गव्हाचा पुरेसा साठा (Wheat storage in FCI Godown)
गव्हाच्या किंमती रोखण्यासाठी मागील वर्षी मे महिन्यात गव्हाची निर्यात रोखण्यात आली आहे. मात्र, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात पुरेसा गव्हाचा साठा असल्याचंही त्यांनी सांगितले. FCI कडील 15 ते 20 लाख टन गहू खुल्या बाजारात मिल्सला विकून भाववाढ कमी करण्याचा निर्णयही सरकार घेऊ शकते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी सुत्रांकडून मिळाली होती. यास ओपन मार्केट सेल स्कीम असे म्हणतात. 
गव्हाची मागणी वाढली
बाजारामध्ये गव्हाची मागणी वाढली असून एफसीआय गोदामातील गहू खुल्या बाजारात विक्री करण्याची मागणी फ्लोअर मिल मालकांनी केली आहे. उष्णतेची लाट आणि खराब हवामानामुळे 2021-22 आर्थिक वर्षामध्ये देशात गव्हाचे उत्पादन फक्त 106.84 मिलियन टन इतके झाले. त्याआधी म्हणजे 2020-21मध्ये गव्हाचे उत्पादन जास्त झाले होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            