Google Pixel: मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत गुगलच्या पिक्सेलच्या 8 या मॉडेलची निर्मिती करणार असून, 2024 पासून भारतीय बनावटीचे हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जगातील नामांकित कंपन्या आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष्य केंद्रीत करू लागल्या आहेत. यापूर्वी अॅपलने आयफोनचे भारतात प्रोडक्शन सुरू करून आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.
टेक्नॉलॉजी सेक्टरमधील जगातील सर्वांत मोठी कंपनी अल्फाबेटने (गुगल) भारत सरकारसोबत फ्लॅगशीप कार्यक्रमांतर्गत पिक्सेल 8 मॉडेलचे प्रोडक्शन भारतात सुरू करण्याचा निर्णय आज जाहीर केला. मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत ही फ्लॅगशीप प्रोग्रॅम राबविला जाणार असून, याचे पहिले प्रोडक्ट 2024 मध्ये बाहेर येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गुगलचे डिव्हाईस आणि सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख रिक ऑस्टरलो (Rick Osterloh, Head of Devices & Services, Google) यांनी ही माहिती दिली. भारत हा पिक्सेलसाठी मोठी बाजारपेठ असल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्विटरद्वारे (X) मेक इन इंडियामध्ये सहभागी होत असल्याचा उल्लेख केला.
गुगलने अॅपल मागोमाग भारतातील आपली बाजारपेठ वाढवण्यासाठी सुरूवात केली. अॅपलने भारतातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी यापूर्वीच आपले नेटवर्क वाढवण्यावर भर दिला आहे. या आर्थिक वर्षात अॅपलने आयफोनचे प्रोडक्शन वाढवले आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरियामधील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेही भारतात गॅलक्सी हॅण्डसेटची क्षमता वाढवली आहे. तर दुसरीकडे स्वस्तात स्मार्टफोन उपलब्ध करून देणारी चायनीज कंपनी शिओमीनेही स्थानिक पातळीवर आपले नेटवर्क वाढवण्यास सुरूवात केली. या वर्षभरात भारत जवळपास 22 टक्के मोबईल फोन निर्यात करणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताने आतापर्यंत 5.5 बिलिअन डॉलर किमतीच्या फोनची निर्यात केली आहे.
गुगल कंपनीने काही दिवसांपूर्वीच पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 Pro हे दोन मॉडेल भारतात लॉन्च केले. हे दोन्ही मोबाईल 5G सपोर्टेड असून यात गुगलने तयार केलेला खास प्रोसेसर आहे. तसेच AI वर आधारित अॅडव्हान्स्ड कॅमेराही या फोनमध्ये आहे. याची भारतातील किंमत 75,999 पासून पुढे सुरू आहे. तर पिक्सेल 8 Pro मोबाईलची किंमत 1,06,999 रुपये पासून पुढे आहे.