भारतीय कर्मचार्यांना या वर्षी त्यांच्या पगाराच्या बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांना 2023 मध्ये पगारात 15 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे असा दावा एका नवीन आर्थिक अहवालात केला गेला आहे.
ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने (Bloomberg) कॉर्न फेरी (Korn Ferry) या फर्मच्या आर्थिक अहवालाचा हवाला दिला आहे, ज्यात असे म्हटले आहे की 2023 मध्ये भारतीय कर्मचार्यांच्या वेतनात 15 ते 30 टक्के वाढ होऊ शकते. आशियाई देशांपैकी भारतातील ही पगारवाढ सर्वाधिक असेल असा अंदाज देखील वर्तवला गेला आहे.
कॉर्न फेरीने (Korn Ferry) केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतीय कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ दिसू शकते. आपल्या गुणवत्तेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पगारापेक्षा 15-30% जास्त पगारवाढ दिली जाण्याचा अंदाज आहे . अहवालानुसार, देशभरातील कर्मचार्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण पगारवाढ ठरू शकते. या फर्मने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात या वर्षी सरासरी 9.8 टक्क्यांनी (Average Hike) वाढ अपेक्षित आहे. उच्च-तंत्रज्ञान उद्योग (High Tech Industries), जीवन विज्ञान (Life Sciences) आणि आरोग्य सेवा (Healthcare) या क्षेत्रात सरासरी 10% पेक्षा जास्त वाढ नोंदवली जाईल असेही म्हटले आहे.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने, इतर पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारत देशातील कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धात्मक वेतनाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते. शिक्षणाचा अभाव (Lack of Education) आणि बेरोजगारी (Unemployment) या भारतातील प्रमुख समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखो लोक सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी रुजू होतात. कौशल्यपूर्ण आणि गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊन भारताची आर्थिक स्थिती आणखी मजबूत केली जाऊ शकते असा अंदाज देखील या अहवालात वर्तवला गेला आहे.