ऍपल मोबाईल फोन आणि आयपॅडचे चाहते जगभरात आहेत. एक स्टेट्स सिम्बॉल म्हणून देखील या ऍपलकडे बघितले जाते. ज्या कुणाकडे ऍपलच्या वस्तू असेल तो ‘श्रीमंत’ आहे अशी एक सार्वजनिक समज आपल्या समाजात रूढ झालेली आहे. परंतु आता हाच स्टेटस सिम्बॉल असलेला मोबाईल फोन किंवा आयपॅड खरेदी करताना तुम्हांला पैसे देण्याची गरज भासणार नाहीये. पण हो,मोबाईल फोन किंवा आयपॅड खरेदी केल्यानंतर मात्र तुम्हांला टप्प्याटप्प्याने पैसे भरावे लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की ही सुविधा ऍपलने भारतात सुरु केली आहे का? तर याचे उत्तर ऐकून तुम्ही निराश होऊ शकता कारण ही सुविधा सुरुवातीच्या टप्प्यात केवळ अमेरिकेत सुरु करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या योजनेला अमेरिकेत चांगला प्रतिसाद जर मिळाला तर इतर देशांमध्ये देखील ही योजना सुरु करण्याचा विचार कंपनी करू शकते.
Buy Now Pay Later (BNPL) सेवा
ऍपलने मंगळवारपासून युनायटेड स्टेट्समध्ये ‘आधी खरेदी करा, नंतर पैसे भरा’ (BNPL) या स्वरूपाची सेवा सुरू केली आहे.एक महत्वाचा ब्रांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍपलचा जगभरातील खप आणि कमाई करोडोंच्या घरात आहे. असे असताना ऍपलला अशी सेवा देण्याची गरज का पडली असा सवाल सामान्य लोक विचारत आहेत.
The Apple Wallet now has a 'buy now, pay later' feature https://t.co/MXkR6e1Y6Y
— WGN Radio 720 (@WGNRadio) March 30, 2023
‘ऍपल पे’ (Apple Pay ही कंपनीची स्वतःची एक स्वतंत्र सेवा आहे. ज्याद्वारे पैशांचे व्यवहार केले जातात. यानिमित्ताने ऍपल पे चा विस्तार आणि वापर वाढवा ही कंपनीची मुख्य योजना असल्याचे मानले जात आहे.
जाणकारांच्या मते ऍपलला केवळ मोबाईल आणि तंत्रज्ञान व्यवसायात सीमित राहायचे नाहीये. अमेरिकेसारख्या देशात जिथे अनेक लोक वित्त सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असतात. अशी कर्ज घेण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेमकी ही गोष्ट हेरून ऍपलने अमेरिकेतील कर्ज पुरविणाऱ्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याच्या हेतूने ही सेवा आणली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये फिनटेक कंपनी (Fintech Sector) एफर्म होल्डिंग्ज (Affirm Holdings) आणि स्वीडिश पेमेंट्स कंपनी क्लार्ना (Klarna) सारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे, या दोन कंपन्यांशी येणाऱ्या काळात ऍपल स्पर्धा करणार असल्याचे मानले जात आहे.
चार टप्प्यात पैसे देण्याची सुविधा
ऍपलने ‘पे लेटर’ ही सेवा ग्राहकांना कोणत्याही व्याजाशिवाय आणि कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही सुविधा देऊ केली आहे. ग्राहकांना iPhones आणि iPads खरेदी करता येणार आहेत आणि सहा आठवड्यांपर्यंत चार टप्प्यात पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सुरवातीला प्रायोगिक तत्वावर काही निवडक ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढच्या टप्प्यात या सुविधेचा विस्तार केला जाणार आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी Apple Pay वरून व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना सांगितले जाणार असून खरेदीसाठी ग्राहकांना $50 ते $1,000 दरम्यान कर्ज दिले जाणार आहे असे कंपनीने जाहीर केले आहे.