हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी 33 व्या क्रमांकावर घसरले होते. परंतु गेल्या काही दिवसांत अदानी समुहाची गाडी पुन्हा एकदा रुळावर येऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत टॉप 20 च्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात दीड अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) अहवालानुसार,अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 21 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Two months on, Hindenburg's short seller attack has left tycoon Gautam Adani reevaluating his ambitions, reverting his focus to core projects https://t.co/Hcemp0f88m
— Bloomberg (@business) March 30, 2023
गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ
खरे तर काही दिवसांपूर्वी श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे 21व्या क्रमांकावर होते.परंतु अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली होती. त्यांनतर ते 24 व्या स्थानावर घसरले होते.परंतु आता पुन्हा एकदा गौतम अदानी 21 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्या कमाईची घोडदौड अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसांत श्रीमंताच्या टॉप 20 च्या यादीत त्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सध्याच्या काळात 56.20 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. एकाच दिवसात अदानी यांची एकूण संपत्ती $1.47 बिलियन इतकी वाढली होती. गेल्या महिन्यात अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. परंतु आता हळूहळू का होईना अदानी समूहाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येते आहे असे चित्र सध्या तरी दिसते आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानीच!
जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी हे आशियातील आणि भारतातील देखील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. परंतु हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर त्यांची जागा रिलायंस ग्रुपच्या मुकेश अंबानी यांनी घेतली आहे. आजघडीला आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या $77.0 अब्ज इतकी नोंदवली गेली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी सध्या 12 व्या क्रमांकावर आहे.मागील महिन्यात ते 8 व्या क्रमांकावर होते.