अमेरिकेची रिसर्च कंपनी हिडेंनबर्गने अदानी ग्रुपच्या आर्थिक क्षमतांबाबत केलेल्या अहवालानंतर अदानी ग्रुपला मोठा तडाखा बसला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली. अदानी ग्रुपचे शेअर मार्केटमध्ये तब्बल 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. या अहवालाचा गौतम अदानी यांनाही व्यक्तिगत पातळीवर मोठा फटका बसला आहे. महिनाभरापूर्वी जगातील दुसरे श्रीमंत उद्योजक अशी मजल मारणाऱ्या गौतम अदानी यांची थेट 33 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 40 बिलियन डॉलर्सखाली आली आहे.
हिंडेनबर्गच्या वादळातून अद्याप अदानी ग्रुप सावरलेला नाही. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत देखील मोठी घसरण झाली आहे. कोरोना संकटात वेगाने प्रगती करुन अदानी यांनी जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतले होते. मात्र मागील महिनाभरात त्यांच्या साम्राज्याला हिंडेनबर्ग रिपोर्टने तडाखे बसले आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा दबदबा कमी झाला आहे. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावरील रिपोर्ट जाहीर केला आणि तिथूनच अदानी यांच्या श्रीमंतीला घरघर लागली. मागील महिनाभरात सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या उद्योजकांमध्ये गौतम अदानी आता दुर्देवाने आघाडीवर आहेत.
मार्च 2021 नंतर पहिल्यांदाच गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 50 बिलियन डॉलर्सखाली आली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी आता जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत 25 व्या स्थानावरुन 30 व्या स्थानी घसरले आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपमधील शेअर्समध्ये 82% पर्यंत पडझड झाली आहे. यामुळे संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांची होरपळ झाली. लाखो कोटी रुपये या पडझडीत बुडाले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत पहिल्या स्थानावर फ्रान्सचे उद्योजक बर्नाड अरनॉल्ट आहेत. दुसऱ्या स्थानी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क आहेत. मुकेश अंबानी या यादीत आठव्या स्थानावर आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 84.1 बिलियन डॉलर इतकी आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनरिज इंडेक्सनुसार 24 फेब्रुवारी 2023 अखेर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता 35.3 बिलियन डॉलर इतकी आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात गौतम अदानी यांच्याकडे 81 बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. सप्टेंबर 2022 मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 150 बिलियन डॉलर्स इतकी वाढली होती. जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनण्याचा बहुमान अदानी यांच्यापासून केवळ एक पाऊल दूर होता. मात्र महिनाभरात अदानी यांच्या संपत्तीत तब्बत 85% घसरण झाली आहे. त्यामुळे ते दुसऱ्या स्थानावरुन थेट 33 व्या स्थानावर घसरले आहेत.
आशियातील श्रीमंत उद्योजकाचा बहुमान गमावला
गौतम अदानी यांनी आशियातील श्रीमंत उद्योजकाचा बहुमान गमावला आहे. महिनाभरात संपत्तीत झालेल्या घसरणीने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजकाच्या पदावरुन खाली घसरले आहेत. त्यांचे पारंपारिक स्पर्धक रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशियातील श्रीमंत उद्योजकाचा बहुमान पटकावला आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.1 बिलियन डॉलर्स इतकी आहे. अंबानी आता आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक असून जागतिक पातळीवर ते आठव्या स्थानी आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याकडील नेटवर्थचा विचार करता अदानी यांच्या तुलनेत मुकेश अंबानी यांच्याकडे 48.8 बिलियन डॉलर्स इतकी अधिक संपत्ती आहे.