Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Investment Loss in Adani: अदानी समूहातील गुंतवणुकीची LIC ने मोजली मोठी किंमत! 50 दिवसांत 50 हजार कोटींचे नुकसान

LIC

LIC Investment Loss in Adani: अदानी ग्रुपमध्ये किरकोळ गुंतवणूक असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) मोठी किंमत मोजावी लागली आहे. 50 दिवसांत एलआयसीला 50 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

हिडेंनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी ग्रुपमधील शेअर्सची धूळदाण उडाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या बड्या गुंतवणूकदारांचे महिनाभरात प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला अदानी ग्रुपमध्ये किरकोळ गुंतवणूक असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) मोठी किंमत मोजावी लागली आहे. 50 दिवसांत एलआयसीला 50 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

अदानी समूहातील शेअरमधील गुंतवणुकीने एलआयसीला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीने अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीपैकी जवळपास 49728 कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. अदानी ग्रुपमधील अदानी एंटरप्राईसेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन या शेअरची मार्केट कॅप प्रचंड कमी झाली आहे. हे कमी की काय तर अंबुजा सिमेंट आणि एसीसी अशा शेअर्सला देखील हिंडेनबर्ग अहवालाची झळ बसली. या सर्व शेअरचे बाजार भांडवल 33242 कोटींनी कमी झाले आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी या सात कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 82970 कोटी इतके होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी ते 33242 कोटी इतके खाली आले आहे. यामुळे एलआयसीचे 50 दिवसांत किमान 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

एलआयसीची अदानींच्या सर्वच शेअरमधील गुंतवणुकीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. एलआयसीची सध्याची गुंतवणूक नकारात्मक आहे. एलआयसीची शेअर मार्केटमधील एकूण गुंतवणूक ही 31 डिसेंबर 2022 अखेर 10.91 लाख कोटी इतकी आहे.  

अमेरिकेची कंपनी हिंडेनबर्गने अदानी ग्रुपमध्ये अनियमितता आणि शेअर्समध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत एक अभ्यास अहवाल जाहीर केला होता. 24 जानेवारी 2023 रोजी हा अहवाल समोर आल्यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली होती. अदानी सूमहाचे शेअर कोसळले होते. यामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. याचा फटका बड्या गुंतवणूकदारांना बसला. एलआयसी देखील या पडझडीत होरपळली.

एलआयसीने अदानी ग्रुपमध्ये केलेल्या प्रचंड गुंतवणुकीवरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. अखेर एलआयसीला अदानी समूहात किती गुंतवणूक केली आहे याचा तपशील जाहीर करावा लागला होता. एलआयसीच्या शेअर मार्केटमधील एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत 1% कमी गुंतवणूक अदानी ग्रुपमध्ये केली असल्याचा दावा करण्यात आला होता.  30 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 'एलआयसी'च्या अदानी ग्रुपमध्ये गुंतवणुकीचे बाजार मूल्य 27 जानेवारी 2023 अखेर 56142 कोटी इतके होते. आता आणखी किती नुकसान एलआयसी अदानी समूहात सोसणार याबाबत एलआयसी मॅनेजमेंटसमोर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिंडेनबर्ग अहवालानंतर दररोज अदानी समूहाबाबत काही ना काही घडामोडी घडत आहे. या अहवालानंतर अदानी समूहाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अडकले आहेत. कोरोना काळात दोन वर्ष अदानी समूहाने वेगाने प्रगती केली होती. याच काळात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड घसरण झाली आहे. 

कोणत्या शेअरमध्ये किती घसरण झाली 

अदानी ग्रुपमधील शेअर्सचा विचार केला तर वर्ष ते आजच्या तारखेपर्यंत (YTD) अदानी टोटल गॅसचा शेअर 78.50% ने घसरला आहे. त्याखालोखाल अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 73.50% ने घसरला आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये आतापर्यंत 71.10% घसरण झाली आहे. अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 64.10% घसरला आहे. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 48.40% घसरण झाली आहे.

याशिवाय नुकताच अदानी समूहाने आघाडीची वृत्तवाहिनी एनडीटीव्हीला खरेदी केले होते. मात्र हिंडेनबर्गच्या वादळात एनडीटीव्हीचा शेअर देखील भुईसपाट झाला. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये आतापर्यंत 41.80% घसरण झाली आहे. अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, अदानी पोर्ट आणि एसीसी या शेअर्समध्ये 28% ते 40% इतकी घसरण झाली आहे. अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल 12 लाख कोटींनी कमी झाले आहे.

'एलआयसी'ची फायद्यातील गुंतवणूक तोट्यात गेली  

एलआयसीने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 30 जानेवारी 2023 अखेर महामंडळ 26000 कोटींच्या फायद्यात होते. मात्र हा सर्व फायदा मागील 24 दिवसांत कमी होत गेला. आता एलआयसीने ज्या पातळीवर गुंतवणूक केली होती जवळपास त्याच पातळीवर आता अदानी समूहातील बहुतांश शेअर्स आले आहेत. हिंदु बिझनेस लाईन या वृत्तपत्राच्या बातमीनुसार एलआयसीचे सध्याचे गुंतवणूक मूल्य 33686 कोटी इतके आहे. एलआयसीने 30127 कोटींची गुंतवणूक केली आहे. 30 जानेवारीनंतर या गुंतवणूक मूल्यात प्रचंड घसरण झाली असून आता ते 22876 कोटी इतके असल्याचे बोलले जाते.