दिल्लीतल्या द लिला पॅलेस हॉटेलमध्ये (The Lila Palace) दुबईतून आलेला एक इसम 1 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर असा तब्बल तीन महिने राहिला. 35 लाख रुपयांच्या वर बिल केलं. पण, त्यातले फक्त 11 लाख रुपये भरून तो पसार झाला, अशी घटना उघड झाली आहे. इंडियन एक्सप्रेसने तशी बातमी दिली आहे. M D शरीफ (M D Sharif) असं या माणसाचं नाव आहे. आणि त्याने लिला पॅलेस हॉटेलला 23 लाखांना गंडवलंय.
दिल्लीच्या मध्यवर्ती कॉनेट प्लेस जवळ हे हॉटेल आहे. आणि इथं शरीफ नावाचा हा इसम 1 ऑगस्ट 2022 ला दाखल झाला. रुम बुक करताना त्याने UAE च्या राज घराण्यातील शेख फालन बिन झायेद अल नाहयान यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं. तशी कागदपत्रं आणि ओळखपत्रंही दाखवली. अर्थात, ती बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. इतकंच नाही तर शरीफने आपल्या रुममधल्या चांदीच्या वस्तू आणि इतरही काही मौल्यवान वस्तू आणि सामान लंपास केलं आहे.
ऑगस्टमध्ये त्याने हॉटेलमधली रुम बुक केली. त्यानंतर पहिल्या महिन्याचं बिल 11 लाख त्याने रोख भरलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात एक चेक त्याने हॉटेलला दिला. आणि 22 नोव्हेंबरला उर्वरित पेमेंट करू असंही त्याने सांगितलं होतं. पण, एक तर दिलेला चेक वटलाच नाही. आणि त्यानंतर M D शरीफही गायब झाला.
त्यानंतर द लिला पॅलेसच्या प्रशासनाने दिल्ली पोलिसांना संपर्क केला. शरीफ हा सराईत गुन्हेगार आहे का, त्याने पूर्वी कुणाला असं गंडवलं आहे का याचा तपास सध्या दिल्ली पोलीस करत आहेत. शिवाय हॉटेलला फसवण्याचा हा पद्धतशीर कट असल्याचाही त्यांचा संशय आहे. त्यांनी M D शरीफ विरोधात लूक-आऊट नोटीस जारी केली आहे.