गेल्याकाही वर्षात भारतात नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, आर्थिक समावेशनातील त्यांचा सहभाग देखील वाढला आहे. नोकरीसोबतच महिलांवर घरातील जबाबदारी देखील असते. अशात महिलांनी आर्थिक साक्षर होणे गरजेचे बनलेले आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक नियोजनाबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.
योग्यरित्या आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र, भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर आर्थिक नियोजनास सुरुवात करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन करताना या टिप्स फॉलो केल्यास महिलांना नक्कीच नक्कीच फायदा होऊ शकतो.
Table of contents [Show]
महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स
गुंतवणुकीला द्या प्राधान्य
नोकरी करणाऱ्या महिलांचा आकडा वाढला असला तरीही पैशांवर त्यांचा अधिकार असतोच असे नाही. त्यामुळे महिलांनी सुरुवातीपासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गुंतवणूक सुरू केल्यास चक्रवाढीचा फायदा मिळतो. एफडी, सोने, मालमत्ता, म्युच्युअल फंड, सरकारी योजना यामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होतो.
बचत व खर्चाचे नियोजन
आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा अनावश्यक खर्च टाळून बचत जास्त करणे हा असतो. त्यामुळे तुमच्या मासिक खर्चाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पगाराची 6 0: 25 : 15 अशी विभागणी करू शकता. पगारातील 60 टक्के रक्कम दैनंदिन खर्चासाठी, 25 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी आणि उर्वरित 15 टक्के रक्कम प्रवासासाठी अथवा इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरू शकता.
तसेच, वेगवेगळी बिले, घराचे भाडे, घर/गाडी ईएमआय इत्यादी खर्चाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, हा खर्च दरमहिन्याला समानच राहणार आहे. हा खर्च न केल्यास तुमच्यावरील कर्जाचा आकडा वाढू शकतो. त्यामुळे अशा खर्चाचे नियोजन योग्यप्रकारे करा.
आर्थिक उद्दिष्ट ठरवून बचत करा
दरमहिन्याला मिळणाऱ्या पगारातील काही पैसे बाजूला काढून ठेवणे याचा अर्थ बचत होत नाही. तुम्ही ठराविक उद्दिष्ट ठरून अल्पकालीन व दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही प्रवासासाठी अथवा घरातील एखादी वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेऊ शकता. तसेच, निवृत्तीनंतरचा खर्च, वैद्यकीय खर्च, घर खरेदी अशा दीर्घकालीन उद्देशाने देखील गुंतवणूक करू शकता. थोडक्यात, एखादा उद्देश तुमच्या समोर असल्यास जास्तीत जास्त बचत करण्यास प्रेरणा मिळते.
आपत्कालीन निधी आणि विमा
भारतात घर सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांकडे असते. त्यामुळे घरातील जबाबदारी व इतर कारणांमुळे अनेक महिलांना नोकरी सोडावी लागते. पैशांची बचत केलेली नसल्यास अशा स्थितीमध्ये मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे महिलांनी सुरुवातीपासूनच आपत्कालीन निधीमध्ये पैसे साचवून ठेवायला हवे. अचानक उद्भवणाऱ्या समस्येवेळी हेच पैसे तुमच्या कामी येऊ शकतात. याशिवाय, विमा काढणे देखील गरजेचे आहे. यामुळे हॉस्पिटलच्या बिलावर खर्च होणारे तुमचे लाखो रुपये वाचतील.
कर-बचतीचे मार्ग
गुंतवणूक करताना कर-बचतीचे वेगवेगळे मार्ग तुम्ही वापरू शकता. अनेक सरकारी योजना अशा असतात, ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला करात सवलत मिळते. तुम्ही अशा योजनांचा फायदा घेऊ शकता. याशिवाय, मालमत्ता पुरुषांच्या नावावर खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या नावावर केल्यास त्याचा देखील फायदा मिळतो. होम लोनवरील व्याजदरात तर सवलत मिळतेच, सोबतच कमी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.