Paishanvar Bolu Kahi: समाजातील सर्व मराठी भाषिकांना अर्थसाक्षर करण्याच्या दृष्टिने 'महाMoney'ने सुरू केलेल्या 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे मुरबाड तालुक्यातील शुभ-आयुष इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये केले होते. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला तोंडलीकर नगरमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दैनंदिन जीवनातील जमा-खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या साध्या-सोप्या टीप्स महिलांनी समजून घेतल्या. यावेळी शुभ-आयुष शाळेच्या संचालिक आणि मुरबाड नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष शितल तोंडलीकर यांनी उपस्थित महिलांना या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तर मुरबाडमधील स्थानिक पत्रकार जयदीप अढाईगे यांनी स्वागत केले.
‘पैशांवर बोलू काही’ कार्यक्रमाची सुरूवात ‘महामनी’ टीमचे सदस्य अक्षय पाटील यांनी केली. अक्षय पाटील यांनी उपस्थित महिलांना बचत म्हणजे काय, उत्पन्न म्हणजे काय? संपत्ती काय असते? तसेच भविष्यकाळातील बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी नियोजन करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अनेक वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रात अर्थ साक्षरता प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणारे दत्तात्रेय काळे यांनी वाढती महागाई, त्याला धरून होत असलेली गुंतवणूक, भविष्यातील वाढते खर्च, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी करावी लागणारी तरतूद, उपचारांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च याची माहिती देऊन आर्थिक साक्षर होणे का गरजेचे आहे. याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठी भरमसाठ पगार किंवा पुरेसा पैसाच लागतो, हा गैरसमज दूर करून मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत, गुंतवणूक आणि आपत्कालीन निधी कसा उभारायचा? सरकारच्या बचतीच्या योजना कोणत्या आहेत? त्यावर सरकार व्याज किती देते? याची माहिती काळे यांनी उपस्थितांना दिली.
त्याचबरोबर चांगला परतावा मिळवून देणाऱ्या पर्यायांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कसे काम करतात. तसेच कर्जाबद्दलचीही माहिती उपस्थितांना यावेळी देण्यात आली. त्यानंतर अंकुश बोबडे यांनी भारतातील बॅंकिंग व्यवस्था, बॅंकांमधून केली जाणारी बचत/गुंतवणूक काय असते. बॅंका ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या सेवा देतात. डिजिटल पेमेंट म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय आहेत? सायबर गुन्हेगार लोकांची कशाप्रकारे फसवणूक करतात. त्यातून स्वत:चा बचाव कसा करायचा? तसेच महिलांनी आर्थिक साक्षरतेबरोबरच डिजिटल साक्षर (Digital Literate) होणे का गरजेचे आहे, हे सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून सांगितले.त्याचबरोबर प्रत्यक्ष सोन्यासोबतच डिजिटल गोल्डचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. डिजिटल गोल्डच्या माध्यमातून ग्राहक अगदी 500 रुपयांपासून सोनं खरेदी करू शकतो, याची माहिती देण्यात आली.
'महामनी' काय आहे?
‘महामनी’ हे आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन करणारे मराठी भाषेतील एकमेव वेबपोर्टल आहे. 'महामनी' वेबपोर्टलवर गुंतवणूक कशी करावी, त्याचे वेगवेगळे पर्याय काय आहेत. इन्शुरन्स कसा काढायचा, तो किती पुरेसा आहे. कर्ज घेताना काय काळजी घ्यावी. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी केली जाते, याची माहिती देते. त्याचबरोबर महामनी वाचकांना आर्थिक घडामोडींची माहिती देणारे आणि अपडेट ठेवणारे डिजिटल वेबपोर्टल आहे.
'पैशांवर बोलू काही...'सारखे कार्यक्रम काळाची गरज!
'महमनी'तर्फे राबवला जाणारा 'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम काळाची गरज असल्याचे सांगत असे कार्यक्रम गावोगावी, खेडोपाडी व्हायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया शितल तोंडलीकर यांनी दिली.तसेच इतर महिलांनी पैसा आपल्या सर्वांसाठी खूप काही आहे. त्यामुळे वाचवला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो वाचवून योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा हे महामनीच्या कार्यक्रमातून कळल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिली.