Green Pharmacy: कोरोनानंतरच्या बदललेल्या परिस्थितीतही आयुर्वेदाच्या प्रॉडक्टसची मागणी कमी झालेली नाही. आयुर्वेदाच्या सूत्रांचा आधार घेऊन, तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड देऊन ग्रीन फार्मसीची आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधनं, फळप्रक्रिया, डेअरी व अन्य घरगुती वापरासाठीची 300 उत्पादने आज ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध आहेत, असे पुण्यातल्या ‘ग्रीन फार्मसी’च्या डॉ. आमोद साने यांनी सांगितले.
Table of contents [Show]
संशोधक ते व्यावसायिक
1993 साली संशोधक वृत्तीच्या आणि शिक्षणानेही संशोधक असलेल्या डॉ. आमोद साने यांनी ग्रीन फार्मसीची सुरुवात केली. फार्मसीचे शिक्षण झाल्यानंतर पुणे विद्यापीठातून आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली. सुरुवातीला धूतपापेश्वरसाठी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मग स्वतःची ग्रीन फार्मसीची उत्पादनांची साखळीच सुरु झाली.
ग्राहकांची रेलचेल
आयुर्वेदिक वैद्य जी प्रीस्क्रिप्शन्स देतात, ती शॉर्टलिस्ट करून त्यातून नवीन फॉर्म्युले तयार करण्याचे काम ग्रीन फार्मसीत होते. धूतपापेश्वर, बैद्यनाथ, रसशाळा यांना लागणारी काही भस्मं ग्रीन फार्मसी बनवते. ग्रीन फार्मसीच्या दुकानात स्वतःची प्रॉडक्ट रेंज आणि बाकी आयुर्वेदिक कंपन्यांची काही औषधे असतात. दिवसाला किमान 150 ग्राहक दुकानाला भेट देतात. दुकानाचा स्वतःचा 30,000 ग्राहकांचा डेटाबेस आहे.
आयुर्वेद: कस्टमाईज सायन्स
पेशंटच्या उपचारांच्या गरजेनुसार कस्टमाईज केलेली वेगवेगळी औषधे आवश्यक प्रमाणात पेशंटला बनवून द्यायचे कामही ग्रीन फार्मसी करते. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ प्रकृतीप्रमाणे प्रत्येक माणसाला लागणाऱ्या औषधाची गरज प्रत्येकाच्या तब्येतीनुसार बदलत असते. त्यामुळे आयुर्वेद हे एक प्रकारचे कस्टमाईज सायन्स आहे असं डॉ. आमोद सांगतात.
सेंद्रिय शेती व कच्चा माल
सेंद्रिय शेतीसाठी लागणारे भारत सरकारचे सर्टीफिकेशन ग्रीन फार्मसीने मिळवलेले आहे. वनस्पतींना लागणारी खतं आणि मातीची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी शेणखत यासाठी ग्रीन फार्मसीमध्ये औषध निर्मितीत जो चोथा शिल्लक राहतो तो चोथा आणि शेण यांचे खत केले जाते. त्यामुळे वनस्पती उत्तम रीतीने वाढतात.
40 उत्पादनांची निर्मिती
देशी गायीपासून पंचगव्य म्हणजे दुध, तूप, दही, गोमुत्र आणि शेण यापासून ग्रीन फार्मसीने 40 उत्पादनांची निर्मिती केली आहे. ही सगळी उत्पादने होम केअर, कॉस्मेटीक्स, अन्न व औषधे या प्रकारातली आहेत.
बाळगुटीसाठी पारितोषिक प्राप्त
बाळगुटीसाठी डॉ. आमोद साने यांना स्टँडर्डाईज मेडिसीनसाठी पारखे गुणवत्ता पारितोषिक मिळाले आहे. बाळगुटी हा 30 घटक असलेला पूर्वापार चालत आलेला फॉर्म्युला आहे. तो ग्रीन फार्मसीने संशोधनाअंती 20 घटक वापरून केला आहे. कोस्मेटॉलॉजी, आयुर्वेद आणि होमकेअरच्या उत्पादन व संशोधनासाठी स्वतंत्रपणे काम करणारी ग्रीन फार्मसीची टीम आहे.
वनस्पतींची जागरूकता
गणपती उत्सवाच्या वेळी पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारची पत्री वापरायची प्रथा आहे. एकवीस पत्रींपैकी ग्रीन फार्मसीच्या शेतामध्ये अकरा पत्रींची झाडे त्यांनी लावली आहेत. वनस्पतींविषयक जागरूकता वाढावी म्हणून, गणपतीचे 2 दिवस या पत्री ग्रीन फार्मसीतर्फे ग्राहकांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
ग्रीन फार्मसीमध्ये तरुणांना संधी
आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्य लोकांना भेटून आयुर्वेदिक उत्पादनांचं मार्केटिंग करणं हा एक चांगला मार्ग होऊ शकतो. बाहेरच्या देशात आपली उत्पादने पोहोचवायचा ग्रीन फार्मसीचा आता मानस आहे. त्यामुळे याबाबतीत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांचे ग्रीन फार्मसी नक्की स्वागत करेल, असे डॉ.साने यांनी सांगितले.
आयुर्वेदाचे संशोधन करणे गरजेचे
आयुर्वेदातल्या सूत्रानुसार उत्पादनं बनवणे, संशोधन करणे, पदवी घेतलेल्या आयुर्वेदिक वैद्यांनी उपचारावरचे रिसर्च पेपर लिहून वास्तव लोकांसमोर आणणे, औषधांच्या वैद्यकीय चाचण्या घेऊन त्यावरची शास्त्रीय माहिती मिळवणे, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असे डॉ. साने म्हणतात.
सल्लागार यंत्रणा उभारण्याचे स्वप्न
येत्या काळात कोणाकडे नव्या औषधाची योजना असल्यास त्याची शहानिशा करून त्यांना परवाना मिळवून देऊन, त्याचे उत्पादन सुरु होण्यासाठी व्यावसायिकरित्या मार्गदर्शन करणारी सल्लागार यंत्रणा उभारण्याचे ग्रीन फार्मसीने ठरवले आहे.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक