Paishanvar Bolu Kahi: महामनी डॉट कॉम हे असे एक वेबपोर्टल आहे; जे मराठी भाषिक समाजातील तळागाळातील सर्व घटकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'महामनी'तर्फे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 'पैशांवर बोलू काही'या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साध्या-सोप्या भाषेत बचत, गुंतवणूक, गुंतवणुकीचे विविध पर्याय, सरकारी योजना आदींची माहिती देण्याचे काम 'महामनी' करत आहे.
'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम म्हणजे फक्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवणारा कार्यक्रम नाही. तर त्यांना उदाहरणासहित त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांचे पूर्णपणे समाधान करणारा एक संवादात्मक प्लॅटफॉर्म आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच जणांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या बचतीच्या योजना किंवा नियमांची माहिती त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नाही. बरीचशी माहिती ही इंग्रजी भाषेतून उपलब्ध होत असल्यामुळे ती समजून घेण्यातही त्यांना अडचणी येतात. अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन महामनी 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैशांवर अडकलेली कोंडी फोडण्याचे काम करत आहे. त्यांना नवीन नियम समजावून सांगितले जातात. त्याची अधिकृत माहिती कोठून मिळू शकेल. याबाबत मार्गदर्शन केले जाते.
'पैशांवर बोलू काही' कार्यक्रमाचा उद्देश
- आयुष्यातील काही दुर्लक्षित आणि भविष्यातील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नांविषयी नागरिकांना जागरूक करणे.
- भविष्यकाळात बचतीचे आणि गुंतवणूक नियोजनाचे महत्त्व काय आहे.
- पद्धतशीरपणे गुंतवणूक करून आयुष्यचक्रातील आर्थिक उद्दिष्ट्ये कशी साध्य करावीत.
पैशाला धरून बऱ्याच कुटुंबामध्ये मुक्तपणे चर्चा केली जात नाही. पैशांचे व्यवहार मुलांसमोर चर्चा केले जात नाहीत. जाणीवपूर्वक मुलांना अशा व्यवहारांपासून दूर ठेवले जाते. परिणामी पैशांवर मुक्तपणे चर्चा होत नाही. त्यामुळे त्याबाबतच्या माहितीचीही देवाण-घेवाण होत नाही. अनेक कुटुंबामध्ये पैशांबाबत, बचतीबाबत, गुंतवणुकीबाबत गैरसमज आहेत. जसे की, शेअर बाजारामधील गुंतवणूक ही जुगार आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. विकलेल्या शेअर्सवर पैसे वेळेवर मिळत नाही. असे समज दूर करण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती देण्याचे काम महामनी 'पैशांवर बोलू काही'च्या माध्यमातून करत आहे.
पैसे साठवून वाढत नाहीत किंवा त्यामुळे जीवनशैलीतही बदल घडून येत नाही. त्यासाठी योग्य मार्गाने कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला तरच त्यातून चांगला परतावा मिळू शकतो, यावर महामनीचा विश्वास असून तो अधिकाधिक लोकांमध्ये पसरवण्याचे काम महामनी पैशांवर बोलू काही या कार्यक्रमातून करत आहे.