गोव्याच्या रिया पाटील (Ria Patil) यांची 2018 मध्ये 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत निर्मल रक्षा अभियानात नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी अनेक व्यावसायिक, सामाजिक संस्था पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचे ‘मॅन्युफॅक्चरर’ म्हणून त्यांना भेटत होते. त्यावेळी रिया पाटील यांच्या लक्षात आले की, पर्यावरणपूरकच्या नावाखाली अनेक व्यावसायिक कंपन्या साधे सॅनिटरी पॅड पुरवत आहे. त्याची गुणवत्ताही खूपच किरकोळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी स्वत: ‘ऑथेन्टिक’ सॅनिटरी पॅडची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच, जिया इंडस्ट्री-जोसा ब्रॅण्डची स्थापना झाली. या ब्रॅण्डच्या माध्यमातून स्त्रियांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संतुलन असे दोन्ही हेतू साध्य होत असल्याचे दिसून येते.
Table of contents [Show]
मार्केटिंग आणि रिसर्चच्या बळावर व्यवसायाला सुरुवात
रिया पाटील यांनी सलग दोन वर्षे सॅनिटरी पॅडविषयी अभ्यास आणि मार्केट रिसर्च करून, बाजारातील इतर सॅनिटरी पॅड आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड यामधील फरक जाणून घेतला. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची आणि किमतीची माहिती त्यांनी घेतली. तसेच पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची निर्मिती करण्यासाठी कोणत्या मशिन्स लागतात? या विषयीची संपूर्ण माहिती मिळवून त्याचा अभ्यास करून मका आणि कापूसपासून त्यांना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची निर्मिती करण्यास यश मिळाले होते. 2020 मध्ये त्यांनी या व्यवसायास सुरूवात केली होती.
80 टक्के कारभार महिलांच्या हाती
रिया यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मशीन्सद्वारे साधारण 6 हजार सॅनिटरी पॅड्सची निर्मिती केली जाते. त्यांच्या फॅक्टरीमध्ये 80 टक्के महिला कर्मचारी आहेत. ऑपरेशन्स आणि पॅकेजिंगची कामे प्रामुख्याने या महिलांकडूनच केली जातात. या कामासाठी महिला कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगसुद्धा दिले जाते.
सामान्य पॅड्स आरोग्याला आणि पर्यावरणासाठी घातक
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सामान्य सॅनिटरी पॅडमध्ये वापरल्या जाणाऱ्या हानिकारक घटकांमुळे स्त्रियांच्या आरोग्याचे प्रचंड नुकसान होते. त्यामध्ये प्लॅस्टिक वापरले जाते; तर काही स्वस्त पॅड्समध्ये अक्षरश: कचरा वापरला जातो. यामुळे महिलांना ‘इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये ‘इन्फर्टिलिटी’ सारखे प्रश्न सुद्धा उद्भवू लागलेत. सामान्य सॅनिटरी पॅड्सचे 600 वर्षे विघटन होत नाही. तसेच हे पॅड जाळल्यास त्यातून येणाऱ्या धुरामुळे पर्यावरणास हानी पोहचू शकते. पर्यावरणपूरकच्या नावाखाली अनेक व्यावसायिक कंपन्या सामान्य सॅनिटरी पॅडची विक्री करतात.
जोसा ब्रॅण्डचे पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड
ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना विश्वास वाटेल असा पर्यावरणपूरक ब्रॅण्ड रिया यांना तयार करायचा होता. पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड हे विघटनशील असतात. साधारण 180 दिवसानंतर त्याचे विघटन होते. जोसा ब्रॅण्डची निर्मिती करून रिया यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
उद्योजिका रिया पाटील या ‘वास्तू कंन्सल्टंट’ सुद्धा आहेत; त्या जोसा ब्रॅण्ड आणि कन्सल्टन्सी अशा दोन्ही गोष्टी सांभाळत आहेत. रिया यांनी जोसाची सुरूवात केल्यानंतर महिला आरोग्य व पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती सुद्धा केली. जोसा वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी कंपनीचे प्रोडक्ट लाखो महिलांपर्यंत पोहोचवले. रिया यांनी या व्यवसायाला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने मोठी गुंतवणूक केली. जोसा ब्रॅण्ड हा ऑनलाईन उपलब्ध असल्याने त्याची ऑर्डरनुसारच निर्मिती केली जाते आणि त्याचा स्टॉक हा फक्त 3 महिन्यांकरीता तयार ठेवला जातो.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक