Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Greetwel Gift Shop: अनोख्या भेटवस्तुंचे भांडार म्हणजे 'ग्रीटवेल'

Greetwel Gift Shop at Pune

Image Source : www.yashaswiudyojak.com

Greetwel Gift Shop: लोकांना आनंदाने भेटा, त्यांना खुश करण्यासाठी हटके भेटवस्तू द्या, अशी कल्पना असलेले पुण्यातील भेटवस्तुंचे भांडार म्हणजे ग्रीटवेल शॉप. या शॉपचे सर्वेसर्वा दीपक जाधव यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी उद्योगाची कथा...

Greetwel Gift Shop: वाढदिवसानिमित्त भेट देण्याच्या उद्देश्याने सुरू केलेलं वेगवेगळ्या आणि अनोख्या भेटवस्तुंचं दुकान दीपक जाधव कित्येक वर्षांपासून यशस्वीपणे चालवत आहेत. काळानुसार किंवा एखाद्या शुभप्रसंगी कोणती भेटवस्तू द्यायला हवी. तसेच ग्राहकाच्या बजेटनुसार आणि त्याच्या आवडीनुसार हवी ती भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात ग्रीनवेल गिफ्ट शॉपचे मालक दीपक जाधव हे भेटवस्तुच्या दुनियेतील मास्टर झाले आहेत.

पुण्यातील ग्रीटिंग कार्डचा ट्रेंड ग्रीटवेलमुळे प्रसिद्ध

80-90 च्या दशकात मोबाईलची सुरुवातही नसल्याने लोकांना पत्रांचं अप्रूप होतं. त्यात रेडिमेड ग्रीटिंग कार्ड हा प्रकार पुण्यात जाधव यांनी पहिल्यांदा आणला होता. हाताने लिहिलेल्या पत्रांमध्ये भावनांचा स्पर्श असला तरी त्याला शोभिवंत मुलामा दिल्यानंतर त्याचं खुलणारं रूप काही औरच असल्याची जाणीव त्यावेळी लोकांना होत होती. ग्रीटिंग कार्डचं हेच नावीन्य पाहून ग्रीटवेलमध्ये भेटकार्ड घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. त्याकाळी तारुण्यात असलेली मुले-मुली आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ग्रीटिंग कार्डची फार क्रेझ होती, असे दीपक जाधव सांगतात.

मराठी कलाकारांनाही ग्रीटवेलची भुरळ

मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीतील बरीच कलाकारमंडळी ग्रीटवेलमध्ये येऊन शुभेच्छा पत्रे आणि इतर भेटवस्तू घेऊन गेले आहेत. यामध्ये विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा मंगेशकर ही नावं सुपरिचित आहेत.

image (6)

प्रत्येक नात्यासाठी ग्रीटवेल सज्ज

बायकोचा वाढदिवस असो किंवा आईचा, प्रत्येक नात्याशी संबंधित ग्रीटिंग कार्ड तुम्हाला ग्रीटवेलमध्ये खरेदी करता येईल. मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रीटिंग्ज या ठिकाणी उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यात तर प्रेमवीरांनी दुकान गजबजून गेल्याच्या आठवणी ग्रीटवेलकडे आहेत.

वैविध्यपूर्ण वस्तूंचे भांडार  

ग्रीटिंग कार्ड व्यतिरिक्त फोटोफ्रेम्स, की-चेन, कॉफी मग, टेडी बिअर्स, म्युरल्स, वेगवेगळ्या डायरीज, फेंगशुई, हॅपी मॅन, परफ्युम बेल्ट्स, वॉलेट्स अशा इतर भेटवस्तूही या ठिकाणी पहायला मिळतात.

image (4)

एकदा जोडलेला ग्राहक पुन्हा येतोच

1978 मध्ये एका छोट्या दुकानातून सुरू झालेला ग्रीटवेलचा प्रवास आता 3 मजली इमारतीपर्यंत पोहचला आहे. पुण्यातील मध्यवर्ती परिसरात हे दुकान असल्याने ग्राहकांची गर्दी नेहमीच याठिकाणी पहायला मिळते. मागील 40 वर्षांत जोडला गेलेला ग्राहक आजही हक्काने या ठिकाणी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी येतो.

मुंबईतून वस्तुंची खरेदी

दिलीप जाधव यांचा मुलगा सुधन्वा जाधव हे आता दुकानाची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळत आहेत. आमची शाखा कुठेही नाही म्हणत जाधवांनी आपले वेगळेपण जपून ठेवले आहे. दुकानात असणाऱ्या वस्तूंची खरेदी मुंबई बाजारातून केली जाते.

ट्रेंड प्रमाणे वस्तूंची मागणी  

टीव्ही चॅनेलवर एखादी सिरीयल चालली किंवा एखादा दमदार चित्रपट आला की त्यातील स्टाईल फॉलो करत गिफ्ट घेण्याकडे तरुणाईचा कल वाढतो. त्यानुसार भेटवस्तूंची खरेदी केली जात असल्याचं सुधन्वा सांगतात.

image (5)

ग्रीटवेल संदेसे आते हैं

सध्या दुकानात ८ कर्मचारी काम करतात. काही वर्षांपूर्वी आकाशवाणी केंद्रावर ’ग्रीटवेल संदेसे आते हैं’ हा उपक्रमही दुकानामार्फत चालवला गेला. वाढदिवस असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून शुभेच्छा देण्याचा हा उपक्रम पुणेकर जनतेला आजही लक्षात आहे.

ऑनलाईन मार्केटिंगसाठी प्रयत्न सुरु

ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने थेट वाढदिवस असलेल्या व्यक्तीच्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवण्याचा प्रकार रुढ झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातूनही व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठवड्यात एकदाही सुट्टी न घेता चालणारे दुकान म्हणून ग्रीटवेलने आपल्या कामातील सचोटी आणि लोकांसाठी उपलब्ध असण्याची बांधिलकी  दाखवून दिली आहे. हटके भेट वस्तू आणि ग्रीटिंग कार्ड देऊन एखाद्याला खुश करायचे असेल तर ग्रीटवेलला नक्की भेट द्या. 

स्त्रोत: यशस्वी उद्योजक