FD Vs SCSS: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. यामध्ये बहुतांश बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे केंद्राच्या अल्प बचत योजनांमधील काही योजनांवरील व्याजदरामध्ये वाढ केली.
अल्प बचत योजनांमधील विविध योजनांपैकी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील (सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींमधून की सरकारी योजनेतून सर्वाधिक लाभ मिळू शकतो. असा प्रश्न काही गुंतवणूकदारांना नक्कीच पडला आहे. त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही योजनांमधील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. यातून तुम्हाला तुमच्या फायद्याची योजना निवडण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आगामी तिमाहीसाठी (ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023) अल्प बचत योजनांवरील व्याजदराची घोषणा केली होती. यामध्ये काही योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली. त्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर गुंतवणूकदारांना डिसेंबरपर्यंत 8.2 टक्के व्याज दिले जाणार आहे. हे व्याजदर मार्केटमधील सार्वजनिक बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या मुदत ठेवींच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे.
सरकारने घोषित केलेले हे व्याजदर 31 डिसेंबर, 2023 पर्यंत लागू असणार आहेत. त्यानंतर सरकार पुन्हा एकदा आढावा घेऊन त्यात बदल करू शकते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवी (FD for Senior Citizen)
खाजगी बँकांचा विचार केला तर एसबीएम बँक (SBM Bank), डीसीबी बँक (DCB Bank), बंधन बँक (Bandhan Bank), इंड्सइंड बँक (IndusInd Bank) या ज्येष्ठ नागरिकांना दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे 8.55 टक्के, 8.50 टक्के, 8.35 टक्के आणि 8.25 टक्के व्याज देत आहेत. हा व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच परवडणारा आहे. तर सरकारी बँकांमध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक 7.90 टक्के व्याज देत आहे. तर इतर बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक या 7.75 टक्के व्याजदर देत आहेत. याचा कालावधी 2 ते 3 वर्षांचा किंवा यापेक्षा जास्त असू शकतो.
व्याजदरातील या फरकावरून आणि कालावधीवरून तुम्ही तुमच्यासाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते, हे ठरवू शकता. तसेच या योजनांबाबतची अधिक माहिती पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून मिळवून त्यानुसार गुंतवणूक करू शकता.