• 27 Mar, 2023 06:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning Tips: वडिलांनी मुलांना पैशांबाबतच्या 'या' 5 गोष्टी नक्की सांगायला हव्यात

Financial Tips

Financial Planning Tips: प्रत्येकाच्या कुटुंबात इतर चर्चेप्रमाणे आर्थिक नियोजनाबाबत चर्चा व्हायला हवी. खास करून वडिलांनी मुलांना आर्थिक नियोजन कसे करावे यासंदर्भात काही गोष्टी सांगायला हव्यात. त्या गोष्टी कोणत्या, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला सुपर हिरो हे आपले वडीलच असतात. ते आपल्याला अनेक गोष्टी कळत-नकळत शिकवतात. त्यांनी सांगितलेल्या आणि शिकवलेल्या अनेक गोष्टी पुढे जाऊन आपल्याला उपयोगीही पडतात. कुटुंबात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा ही होतच असते, पण आर्थिक चर्चा मात्र झालेली पाहायला मिळत नाही. आपल्या मुलांनी आर्थिक नियोजन (Financial Planning) कसे करावे, यासाठी वडिलांनी आपल्या मुलांना कानमंत्र द्यायला हवा. हाच कानमंत्र मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे जाऊन कामी येईल. पण हा कानमंत्र किंवा आर्थिक गोष्टी नेमक्या कोणत्या हे आपण जाणून घेऊयात.

वडिलांनी मुलांना सांगाव्यात अशा 5 आर्थिक गोष्टी

अनावश्यक खर्च टाळा आणि पैशाची बचत करा

कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी खरंच ती गोष्ट गरजेची आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जर त्या गोष्टीची खरंच गरज असेल, तर ती वस्तू खरेदी करा. बऱ्याच वेळा आपण अनेक गोष्टी गरज नसताना खरेदी करतो. त्यामुळे आपला अनावश्यक खर्च वाढतो.

उदा. शॉपिंगला गेल्यानंतर अनेक वेळा आपण अनावश्यक गोष्टी खरेदी करून घरी घेऊन येतो. मात्र घरी आल्यानंतर आपल्याला अतिरिक्त झालेला खर्च लक्षात येतो. त्यामुळे शॉपिंगला जाण्यापूर्वी खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट तयार करून घ्या आणि आवश्यक तेवढ्याच गोष्टी खरेदी करा, जेणेकरून पैशांची बचत होईल. हीच छोटी बचत उद्याची मोठी गुंतवणूक बनू शकते.

योग्य वयात गुंतवणुकीला प्राधान्य देणे

वडिलांनी मुलांना गुंतवणुकीचे (Investment) महत्त्व पटवून द्यायला हवे. मुलांना कळत्या आणि योग्य वयात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले, तर भविष्यात मुलांना गुंतवणुकीची सवय लागेल. मुलांचे 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थिक गुंतवणुकीबद्दल (Financial Investment) माहिती द्यायला हवी. त्यांचे स्वतःचे वैयक्तिक बँक अकाउंट ओपन करून द्यायला हवे. भिशी, पर्सनल बँक अकाउंट, म्युच्युअल फंड किंवा पोस्टातील वेगवेगळ्या योजना यातील गुंतवणुकीबद्दल मुलांना प्राथमिक माहिती असायला हवी. त्यांना लहानपणापासून भिशीमध्ये पैसे साठवण्याची सवय ही कुटुंबाकडून लावली जावी. याशिवाय महिन्याला ठराविक रक्कम बचत खात्यात (Saving Account) गुंतवण्याची सवय मुलांना असायला हवी.

गुंतवणुकीमध्ये विविधता राखणे

different-investment-options.jpg

मुलांना गुंतवणुकीबद्दल माहिती देताना त्यांना गुंतवणुकीतील वैविध्याबद्दल सांगायला हवे. केवळ भिशी आणि बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी मुलांना बँकेतील मुदत ठेव, म्युच्युअल फंड, शेअर्स, सोने-चांदी, रिअल इस्टेट, पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना याबद्दल माहिती असायला हवी. या योजनेमधून मिळणारा परतावा, त्याचा कालावधी नक्की किती असतो, याबद्दलही मुलांना शिक्षित करणे ही पालकांची जबाबदारी आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपातील गुंतवणुकीचे वेगवेगळे फायदे आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक केलेली रक्कम अडचणीच्या वेळी काढता यायला हवी. जेणेकरून संकटकाळात ही रक्कम मदत करेल.

इमर्जन्सी फंडाची तरतूद

भविष्यातील धोके जसे की, आजारपण, अचानक नोकरी जाणे इत्यादी गोष्टींसाठी काही रक्कम बाजूला ठेवायला हवी. याच रकमेला इमर्जन्सी फंड (Emergency Fund) असेही आपण म्हणू शकतो. ही रक्कम किमान आपल्या मासिक वेतनाच्या किंवा खर्चाच्या सहा पटीहून जास्त असावी. या रकमेचा वापर हा केवळ आपत्कालीन परिस्थितीतच करावा जेणेकरून त्यावेळेची आर्थिक स्थिती सुधारता येईल. हा फंड तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणे अपेक्षित आहे; जो ऐनवेळी काढता येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीकडे त्याचा आपत्कालीन निधी असावा. ही रक्कम तुम्हाला आर्थिक सुरक्षा पुरवण्यासाठी मदत करते.

आर्थिक नियोजन करून दर्जेदार आयुष्य जगणे

प्रत्येकाने त्याच्याकडील पैशाचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या मासिक उत्पन्नाचे योग्य नियोजन करून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. आज केलीली गुंतवणूक ही भविष्यातील पुंजी म्हणून कामी येते. आपल्याला दर्जेदार आणि सुखकर आयुष्य जगायचे असेल, तर आपल्या पैशाचे व्यवस्थापन आणि विभाजन करणे गरजेचे आहे. या विभाजनानुसार एक ठराविक रक्कम एका ठराविक कामासाठी द्यावी आणि उर्वरित रकमेची गुंतवणूक करावी. गुंतवलेल्या याच रकमेतून तुम्ही हौसमौस करू शकता. याशिवाय तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी खरेदी  करू शकता आणि दर्जेदार आयुष्य जगू शकता.