• 05 Jun, 2023 20:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO: घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी पीएफमधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO Money for New Home Buying

EPFO: घर खरेदी करणे किंवा बांधणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा जरी पर्याय उपलब्ध असला , तरीही 20% डाउनपेमेंटची तरतूद ही स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी नोकरदार व्यक्ती पीएफ खात्यातील (PF Account) पैसे काढू शकतो का? यासंदर्भात नियम काय सांगतो जाणून घेऊयात.

आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या आर्थिक गुंतवणुकीपैकी एक म्हणजे घराची खरेदी किंवा बांधकाम. या गोष्टीसाठी मोठ्या रकमेची गरज असते. अनेकजण स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्जाची मदत घेतात. बँका 80% पर्यंत गृहकर्ज उपलब्ध करून देत असल्या तरीही, उर्वरित 20% डाऊनपेमेंटची सोय ही आपल्यालाच करावी लागते. अशा वेळी केलेली आर्थिक गुंतवणूक कामी येते.

प्रत्येक नोकरदार व्यक्ती त्याच्या निवृत्तीसाठी ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees' Provident Fund) खात्यात गुंतवतो. हे खाते भारत सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येते. नोकरदार व्यक्तीच्या निवृत्तीनंतर यातील रक्कम व्यक्तीला काढता येते. मात्र आपत्कालीन परिस्थतीमध्ये महत्त्वाच्या कामांसाठी यातील रक्कम काढण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्या परिस्थितीमध्ये पीएफ खात्यातून पैसे काढता येतात?

पीएफ खात्यातील (PF Account) रक्कम निवृत्तीनंतर काढता येते. मात्र त्याशिवाय नोकरी गेल्यानंतर (Job Lost), उच्च शिक्षणासाठी (Higher Education),लग्नासाठी (Wedding), मेडिकल इमर्जन्सीकरिता (Medical Emergency) यातील पैसे काढता येतात. तसेच घराची डागडुजी करण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी देखील पीएफ खात्यातील पैसे काढता येतात. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्याला कमीत कमी 5 वर्ष पीएफ खात्याचा सदस्य असणे गरजेचे आहे. घर बांधण्यासाठी पीएफ खात्यातून नोकरदार व्यक्ती ऍडव्हान्स (Advance) रक्कम काढू शकतो. त्यासाठी त्याला फॉर्म 31 भरणे गरजेचे आहे. हा फॉर्म EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रक्रिया काय असेल?

फॉर्म 31 तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. हा फॉर्म भरून तुम्हाला एम्प्लॉयरला (Employer) द्यावा लागेल. त्यानंतर एम्प्लॉयर हा फॉर्म EPFO ला पाठवेल. तुम्ही केलेल्या अर्जावर EPFO कडून प्रक्रिया करण्यात येईल आणि त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे पाठवण्यात येतील.

Form 31 भरण्यासाठी 'या' कागदपत्रांची आवश्यकता आहे 

  • घर खरेदी कागदपत्रं किंवा होमलोनचे कागदपत्रं (Home purchase documents or home loan documents)
  • रहिवासी पत्ता (Residential address)
  • ओळखपत्र (Identification card)
  • नोकरी संदर्भातील कागदपत्रं (Employment related documents)

किती पैसे मिळतील?

जागेची खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या साईटच्या खरेदी करण्यासाठी पीएफ खात्यातून 24 महिन्यांची बेसिक सॅलरी (Basic Salary) आणि डीए (DA) काढला जाऊ शकतो. तसेच घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी 36 महिन्यांची बेसिक सॅलरी आणि डीए पीएफ खात्यातून काढता येऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे पीएफ खात्यातील व्याजासोबत कर्मचारी आणि एम्प्लॉयर यांची मिळून तयार झालेल्या रकमेतून ही रक्कम तुम्हाला देण्यात येईल. ही रक्कम कर्मचारी एकदाच काढू शकतो.