सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु असल्याने सगळीकडे लग्नाचा माहोल दिसत आहे. आता लग्न म्हटले की खर्च हा आलाच. साहजिकच त्यासाठी पैशांची गरज असते. कित्येकजण याच क्षणासाठी गुंतवणूक करत असतात. जेणेकरून ऐनवेळी कुणापुढेही पैशांसाठी हात पसरण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक नोकरदार महिन्याला ठराविक रक्कम त्याच्या PF खात्यात जमा करत असतो. या रकमेवर सरकारकडून चांगला व्याजदरही दिले जाते.
अलीकडे सरकारने PF खात्यातील ठराविक रक्कम महत्त्वाच्या कामांसाठी काढण्याची परवानगी दिली आहे. पण यामध्ये लग्नासाठी PF अकाउंटमधून पैसे काढता येतात का? यासंदर्भातील नियम काय आहे आणि त्याची प्रक्रिया काय असते, हे समजून घेऊ.
पीएफबाबत नियम काय आहे?
कर्मचारी नोकरी करताना त्याला मिळणाऱ्या मासिक पगारातून ठराविक रक्कम PF खात्यात जमा होत असते. ज्यावर सरकार 8.10 टक्के व्याजदरही देते. ही रक्कम कर्मचारी महत्त्वाच्या कामासाठी काढू शकतात. जसे की, लग्न, उच्च शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी पीएफमधून पैसे काढता येतात. मात्र त्यासाठी काही नियम घालण्यात आले आहेत. ते नियम काय आहेत. हे आपण समजून घेऊ.
सरकारच्या नियमानुसार लग्न कार्यासाठी PF खात्यातून निधी काढता येतो. EPFO ने यासंदर्भातील ट्विट करून अधिकृत माहिती दिली आहे. या ट्विटनुसार कोणतीही व्यक्ती स्वतःच्या लग्नासाठी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या लग्नासाठी PF खात्यातून ठराविक रक्कम काढू शकतो. PF खात्यातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी काढता येते. त्यापेक्षा जास्त रक्कम कर्मचाऱ्याला काढता येत नाही.
PF खात्यातील ही रक्कम काढण्यासाठी खातेधारक म्हणून कर्मचाऱ्याला किमान 7 वर्षाचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. याशिवाय लग्न, शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी कर्मचाऱ्याने 3 पेक्षा जास्त वेळा PF खात्यातून रक्कम काढलेली नसावी. तुम्ही जर या सर्व अटींची पूर्तता करत असाल, तर तुम्ही PF खात्यातून 50 टक्क्यांपर्यंत निधी काढू शकता.
पैसे काढण्याची प्रक्रिया काय?
सर्वप्रथम तुम्हाला EPFO च्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी लॉग करण्यासाठी UAN नंबर आणि पासवर्ड इनसर्ट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करून Claim या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन स्क्रिन ओपन होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार डिजिट भरावे लागतील आणि त्यानंतर YES या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
या टप्प्यानंतर तुमच्यापुढे एक सर्टिफिकेट येईल ज्यावर तुम्हाला साईन करावी लागेल. ही साईन झाल्यानंतर Proceed to Online Claim या पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमध्ये काही पर्याय पाहायला मिळतील. तुम्हाला जेवढी रक्कम हवी असेल. ती एंटर करून चेकची स्कॅन कॉपी त्याठिकाणी जोडावी लागेल.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा राहता पत्ता भरून Get Adhar OTP या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, जो एंटर करून Claim या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुमच्या नियुक्त्याकडून तुम्ही केलेल्या अर्जावर परवानगी दिल्यानंतर तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होतील.