बेरोजगारीची मुख्य समस्या आज आपल्या देशासमोर आहे. युवकांना रोजगार मिळावा, वेगवेगळ्या क्षेत्रांचा विकास व्हावा, यासाठी सरकारी पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जगावर आर्थिक मंदीचं संकट आलेलं असताना त्याचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर अजून झालेला नाहीये. याचे कारण म्हणजे भारतात उद्योगधंद्यामध्ये होत असलेली वाढ. आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होत असताना अशी काही इतर क्षेत्रे आहेत जिथे रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत.Naukri.com च्या पाहणी अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.
Naukri.com हे पोर्टल रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना देशभरातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असते. या पोर्टलच्या पाहणीनुसार भारतात रिअल इस्टेट हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पन्न करत आहे. रिअल इस्टेट पाठोपाठ बँक आणि वित्तीय सेवा क्षेत्र तसेच विमा क्षेत्रातही रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
नोकरी जॉब इंडेक्स (Naukri Job Index)
Naukri.com दर महिन्याला कुठल्या क्षेत्रात किती रोजगार उत्पन्न झाले आणि किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती प्रकाशित करत असते. पोर्टलवर आलेल्या नव्या रोजगाराच्या जाहिराती आणि त्यासाठी उमेदवारांनी केलेले अर्ज आणि त्यांची नियुक्ती या सगळ्यांच्या आधारावर जॉब इंडेक्स जाहीर केला जातो. याच आधारावर नोकरी डॉट कॉमने रिअल इस्टेट, बँक आणि वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध होत असल्याचे म्हटले आहे.
शहरीकरणामुळे वाढले रोजगार
शहरांचा वेगाने होत असलेला विस्तार आणि मेट्रो शहरांमध्ये सुरू असलेले निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात इंजिनिअर, व्यवस्थापक, आर्किटेक्ट यांना मोठी मागणी आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले बँक आणि विमा क्षेत्र देखील विस्तारत चालले आहे असे अहवालात म्हटले आहे. बँकिंक सेवा आणि वित्तीय सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या निर्माण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील नोकरभरतीत अनुक्रमे 28 टक्के, 22 टक्के आणि 19 टक्के वाढ झाली आहे.यावर्षी 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापकांना अधिक मागणी होती असे अहवालात म्हटले आहे.
रिअल इस्टेट व्यतिरिक्त, तेल आणि वायू क्षेत्रात रोजगाराची वार्षिक वाढ 20 टक्के, विमा क्षेत्रातील रोजगार वाढ 13 टक्के आणि बँकिंग क्षेत्रातील रोजगार वाढ 11 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. वाहन क्षेत्र आणि औषधनिर्माण क्षेत्रातील रोजगारांमध्ये अनुक्रमे चार टक्के आणि तीन टक्के वाढ झाली आहे. तसेच आयटी क्षेत्रातील रोजगार कमी होत असून गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत त्यात 27 टक्क्यांनी घट झाली आहे, असे निरीक्षण देखील नोंदवले गेले आहे.