सोशल मीडिया (Social Media) कंपनी ट्विटरसाठी (Twitter Inc) मागचं वर्षं खूपच वादळी गेलंय. आणि त्या धक्क्यातून कंपनी अजूनही सावरलेली दिसत नाहीए. कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी को वर्किंग स्पेस बंद करण्याचा आपला इरादा एका ट्विटर स्पेसमध्येच बोलून दाखवला होता. आणि ते त्यावर प्रत्यक्ष अंमल करतानाही दिसतायत.
ट्विटर कंपनीच्या मुंबईत BKC, दिल्लीत कुतुब भागात अशा को वर्क स्पेस आहेत. आणि या दोन्ही बंद करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2022 पासून सुरू झाल्याचं समजतंय. इतकंच नाही तर बंगळुरू इथं असलेलं स्वत:चं ऑफिसही कंपनी बंद करतेय. मुंबईत BKC इथं असलेल्या जागी ट्विटरचे 150 कर्मचारी बसत होते. तर दिल्लीतल्या कार्यालयात 80 कर्मचारी कार्यरत होते. जागतिक पातळीवर ट्विटर कंपनीत जे घडतंय त्याचाच हा एक भाग असल्याचं बोललं जातंय.
नोव्हेंबर महिन्यात नवे मालक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक खरमरित ईमेल पाठवला होता. ‘कंपनीबरोबर राहायाचं असेल तर जास्त काळ आणि पहिल्यापेक्षा जास्त ऊर्जेनं काम करण्याची तयारी ठेवा. नाहीतर, तीन महिन्यांचा मोबदला घेऊन चालते व्हा!’ या शब्दांत मस्क यांनी सुनावलं होतं.
ज्या कर्मचाऱ्यांना मस्क यांनी स्वत: कामावरून काढलं नाही, त्यांना त्यांनी ईमेल वरून त्यांची जागा सुरक्षित असल्याचंही कळवलं होतं. असा ईमेल मिळालेल्या लोकांना कर्मचारी मस्करीने ‘survivors’ असं म्हणतात. भारतातले कर्मचारी त्या अर्थाने सर्व्हायव्हर्स आहेत. पण, आता त्यांना बसायला जागा नसणारए.
11 जानेवारीला मस्क यांनी सिंगापूरमधल्या कर्मचाऱ्यांनाही असंच पूर्वसूचना न देता घरून काम करायला सांगितलं होतं. एका सकाळी सिंगापूरमधल्या कर्मचाऱ्यांना ईमेल आले की, ‘संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ त्यांच्यापाशी आहे. या वेळेत कार्यालय खाली करावं. आणि घरून काम करायला सुरुवात करावी.’ बस्स. या व्यतिरिक्त त्यांनी काहीच कळवलं नव्हतं.
एलॉन मस्क यांनी ट्टिटर ताब्यात घेतल्यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली आहे. आणि याचा फटका भारतालाही बसलाय. भारतात 200 पैकी 90% कर्मचाऱ्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            