गेल्या काही महिन्यापासून देशभरात भाजीपाला, कडधान्ये विशेषतः तूर डाळ, मेथी, पालक, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. लांबलेला उन्हाळा, पावसाळ्यात उभ्या राहिलेल्या दळणवळणाच्या समस्या यामुळे बाजारात शेतीमालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चढ्या किमतीने शेतीमाल खरेदी करावा लागतो आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरीकांचे किचन बजेट कोडमडले आहे.
या सर्वांचा परिणाम आता किरकोळ बाजरात देखील पहायला मिळतो आहे. सर्वसामान्य भारतीय आता किराणामाल खरेदी करताना, खाद्यपदार्थ खरेदी करताना लहान पॅकेट्स आणि पाऊचमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.
स्वयंपाकघराचे बजेट बिघडले
शेतीमालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्या यांमुळे रेडीमेड उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. म्हणजेच ठोक माल खरेदी करण्यापेक्षा सुटा माल, पाऊचमध्ये मिळणारा माल सामान्य नागरिक खरेदी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई हे होय. नागरिकांचे स्वयंपाकघराचे बजेट सध्या बिघडले असून, वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी सामान्य ग्राहकांनी हा मार्ग निवडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
टोमॅटोला शोधला पर्याय
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर सारख्या शहरांत टोमॅटोचे दर कमालीचे महागले आहेत. काही शहरात टोमॅटोने शंभरी पार केली आहे. अशा परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी टोमॅटो ऐवजी टोमॅटो प्युरीच्या पाऊचला पसंती दिल्याचे दिसते आहे. गेल्या महिनाभरापासून टोमॅटो प्युरीच्या मागणीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच अद्रक पेस्ट आणि जिऱ्याचे छोटे छोटे पाऊच देखील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
फळे देखील महागली
पावसाचा वाढता जोर आणि बाजारात कमी झालेली आवक यामुळे फळे देखील महागली आहे. आषाढ आणि श्रावण महिन्यात सण समारंभांची, व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. यात फळांना मोठी मागणी असते. सध्या केळी, चिकू, मोसंबी, पेरू या नेहमीच आहारात असलेल्या फळांच्या देखील किमती वाढल्या आहेत. त्यामुळे फळांची खरेदी करताना नागरिक 2-3 नग फळे खरेदी करताना दिसत आहेत.