Home Loan EMI Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 2022-2023 या आर्थिक वर्षात एप्रिलपासून आता डिसेंबरपर्यंत पाचवेळा रेपो दरामध्ये वाढ केली आहे. यामुळे आरबीआयचा रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याचा हा दर 2018 पासूनचा सर्वाधिक दर असल्याचे दिसून येते. रेपो दरामध्ये वाढ केल्यानंतर देशातील सार्वजनिक आणि खाजगी बॅंका या कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आल्या आहेत. आतापर्यंत होम लोन कर्जदारांच्या व्याजदरात बॅंकांनी 3 वेळा दरवाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या पगारात होणारी किमान 10 टक्के पगारवाढ सुद्धा कमी वाटू लागली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी (दि. 7 डिसेंबर) पुन्हा नमूद केले की, येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. या पार्श्वभूमीवर 2023 मध्ये नोकरदार वर्गाची किंवा सर्वसामान्यांच्या पगारात होणारी किमान 10 टक्क्यांची पगारवाढ हा आशेचा किरण ठरत होती. पण सध्या ज्या पद्धतीने जगभरात मंदीचे सावट सुरू आहे. कंपन्या नोकरकपात करू लागल्या आहेत. महागाई काही केल्या कमी होईना. त्यामुळे पगारात होणारी 10 टक्क्यांची पगारवाढ ही होम लोन असणाऱ्या नोकरदार वर्गाला काहीच उपयोगाची ठरणार नसल्याचे दिसून येत आहे. कारण वाढती महागाई आणि बॅंकांकडून कर्जावर वाढत जाणाऱ्या सततच्या व्याजदरामुळे 10 टक्क्यांची पगारवाढ ही त्यातच खर्ची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पगारातला बराचसा भाग ईएमआयवर खर्ची!
नोकरदार वर्गातील बरेच जणांचे होम लोन किंवा कार लोन सुरू असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 62 हजार रुपये मासिक पगार आहे आणि त्याने घरासाठी 40 लाखांचे कर्ज घेतले हे. या लोनवरील कर्जाचा व्याजदर 7 टक्के आणि कर्ज फेडण्याचा कालावधी 20 वर्षे आहे. तर त्या व्यक्तीला किमान 31,012 रुपये प्रति महिना ईएमआय भरावा लागेल. म्हणजे त्याच्या पगारातील 50 टक्के रक्कम ही ईएमआयवर खर्च होणारी आहे. त्यात बॅंका आता सातत्याने कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे कर्जाचे व्याजदर वाढले की, आपोआप ईएमआय सुद्धा वाढणार आहे. यामुळे पूर्वी पगारातील 50 टक्के रक्कम जी ईएमआयवर खर्च होत होती. ती आता 55 ते 60 टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. यामुळे पगारात किमान 10 टक्के होणारी वाढसुद्धा होम लोन घेतलेल्यांना परवडणार नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            