Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation: भारताचा महागाई दर पुढील आर्थिक वर्षात 5.1 टक्क्यांवर  

किरकोळ महागाई दर

जागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.

जागतिक बँकेनं (World Bank) भारताचा किरकोळ महागाई दर (CPI) पुढील आर्थिक वर्षासाठी 5.1% इतका असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत एक अहवाल सादर केला. आणि तेव्हाच भारतीय अर्थव्यवस्थेची पुढची दिशाही स्पष्ट केली.        

‘2023-24 या आर्थिक वर्षात देशातला महागाई दर कमी होऊन तो रिझर्व्ह बँकेनं आखून दिलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेत येईल,’ असं शर्मा यांनी स्पष्ट केलं.       

आता देशात असलेली महागाई अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे असंही जागतिक बँकेनं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकासदर 6.5% ते 6.9% च्या आसपास राहील असा अंदाजही जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे.       

जागतिक बँकेनं सादर केलेला हा अहवाल ताज्या जीडीपी आकड्यांवर आधारित आहे. आणि हे आकडे अपेक्षेपेक्षा वर असल्यामुळे महागाई दरही आटोक्यात राहण्याचा अंदाज आहे असं ध्रुव शर्मा यांचं म्हणणं आहे.       

‘जीडीपीचे चांगले आकडे असं दर्शवतात की, देशातले आर्थिक व्यवहार आता हळू हळू सुरळीत सुरू झाले आहेत. आणि विशेष म्हणजे शेजारी किंवा इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतातही परिस्थिती सध्या चांगली आहे,’ शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.       

या अहवालात 2023-24 आर्थिक वर्षासाठीचा विकास दर अंदाज मात्र जागतिक बँकेनं 7% वरून 6.6% वर आणला आहे.       

‘रुपयाची कामगिरी सुधारली’      

भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना इतर विकसनशील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेशी केली पाहिजे असं मत जागतिक बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आणि असा तुलनात्मक अभ्यास केला असता  भारतीय रुपयानेही चलन म्हणून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.       

2022-23 या आर्थिक वर्षात रुपयाचं मूल्य 10% नी घसरलं आहे. हा आकडा स्वतंत्रपणे बघितला तर मोठाच आहे. पण, तुलनात्मक अभ्यास केला असता इतर देशांच्या तुलनेत ही कामगिरी उजवी आहे, असं जागतिक बँकेचं मत आहे.       

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 83 रुपयांपर्यंत घसरला होता. आता वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात रुपया 82 पर्यंत वधारला आहे. रुपयाच्या घसरणीमागे प्रगत देशांतील मध्यवर्ती बँकांचं पतधोरण हे ही एक महत्त्वाचं कारण असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर मोहिमेवर आहे. अशा धोरणाची परिणीती असा देश व्यापार करत असलेल्या देशांमधलं चलन घसरण्यामध्ये होते.