एखादा व्यक्ती ज्यावेळी नोकरीला लागतो, त्यावेळी साहजिकच त्याला मिळणाऱ्या मासिक उत्पन्नातून काही हिस्सा तो स्वतःच्या गरजांवर खर्च करतो. तर उर्वरित रकमेपैकी काही भाग तो सेविंगसाठी राखून ठेवतो. अगदी सुरुवातीपासून पैसा वाचवला, त्याची योग्य ठिकाणी गुंतणूक केली, तर भविष्यात तो कामी येतो. याच दृष्टीने तो सुरक्षित जागी गुंतवण्याचा विचार अनेकजण करतात. त्यामुळे बऱ्याच वेळा खाजगी आणि सरकारी कर्मचारी साहजिकच सरकारी बचत योजनांकडे वळतात. त्यातही ईपीएफ (EPF), पीपीएफ (PPF) आणि जीपीएफ (GPF) हे पैसे गुंतवण्याचे पर्याय आपल्याला सतत ऐकायला मिळतात. पण ईपीएफ, पीपीएफ आणि जीपीएफ म्हणजे नक्की काय? याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.
PPF म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी जो सगळ्यांसाठी खुला असतो. EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जो खाजगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना दिला जातो. तर GPF म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंड हा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो. पीपीएफ, ईपीएफ आणि जीपीएफमध्ये नेमका फरक काय? याबद्दल आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) म्हणजे काय?
पीपीएफ (PPF) ही सरकारकडून चालवण्यात येणारी एक बचत योजना आहे. ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती खाते उघडून बचत करू शकते. हे खाते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडता येते. या खात्यात तुम्हाला दरवर्षी किमान 500 रुपये भरावे लागतील.
एक लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षात पीपीएफ (PPF) खात्यात तुम्ही पैसे भरले, तरच हे खाते चालू राहील. रोख रक्कम, चेक, पोस्टल ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, एकच वार्षिक हप्ता किंवा दरमहिना ठराविक रक्कम भरणे अशा अनेक सुविधा या अंतर्गत दिल्या जातात.
फायदे काय?
- कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते
- सरकारी योजना असल्याने पीपीएफ खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नाही
- पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँका, निवडक खासगी बँका या ठिकाणी उघडता येते
- या खात्यात जमा केलेल्या रकमेवर कलम 80 C (Income Tax Act of 1961) अंतर्गत कर कपातीचा लाभ घेता येतो
- पीपीएफ खात्यात प्रत्येक वर्षाला किमान 500 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये भरता येतात
- खाते उघडल्यापासून 7 वर्षानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी देण्यात येते किंवा त्या रक्कमेवर कर्जही मिळते
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) म्हणजे काय?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी (EPF) 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असणाऱ्या कंपन्यांमध्ये देण्यात येतो. याअंतर्गत पगारदार वर्गासाठी ईपीएफ खातं उघडलं जातं. यामध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश ही करण्यात आला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) हे खाते चालवले जाते. यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराचा 12 टक्के भाग या खात्यात जमा करण्यात येतो, शिवाय तितकीच रक्कम कंपनीही जमा करते. ईपीएफ खात्यातील व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जात असून या खात्यात 8.10 टक्के व्याजदर देण्यात येते.
फायदे काय?
- नियमितपणे कर्मचार्यांच्या पगारातून पैसे कापले गेल्यामुळे, मोठ्या प्रमाणात पैसे वाचवता येतात
- खासगी कंपनीत काम करणाऱ्यांना निवृत्तीनंतर याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो
- अडचणीची परिस्थिती आल्यास पीएफ खात्यामधून पैसे काढता येतात
सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) म्हणजे काय?
जीपीएफ ही पीपीएफ (PPF) सारखीच योजना असली तरी, यामध्ये केवळ सरकारी कर्मचारीच काँट्रीब्युट करू शकतात. सोप्या पद्धतीने समजून घायचे तर, जीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही निवृत्तीनंतरच्या पैशांचे नियोजन असू शकते. कारण, यामध्ये गुंतवलेली रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मिळते.
सरकारी कर्मचारी त्यांच्या मासिक पगारातील ठरावीक रक्कम GPF खात्यात जमा करु शकतात. एक लक्षात असू द्या की, सरकार जीपीएफमध्ये कोणतेही काँट्रीब्युशन करत नाही, यामध्ये केवळ कर्मचारीचं काँट्रीब्युशन करतात. कर्मचारी गरज पडल्यास जीपीएफ खात्यातून ठराविक रक्कम काढू शकतात आणि काही काळाने पुन्हा जमा करू शकतात. यावर कोणताही कर लागू होत नाही.
फायदे काय?
- अर्थ मंत्रालय दर तीन महिन्याला जीपीएफच्या व्याजदरामध्ये बदल करते
- आयकराच्या कलम 80 C (Income Tax Act of 1961) अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो
- एका आर्थिक वर्षात जीपीएफमध्ये केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकते
- GPF खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसदार GPF नियमानुसार पेमेंटसाठी पात्र ठरतो, मात्र त्यासाठी कर्मचाऱ्याने किमान 5 वर्षे काम केलेले असणे गरजेचे आहे
तिन्ही योजनांमध्ये फरक काय?
या तिन्ही योजना नक्की काय आहेत आणि त्याचे फायदे काय हे आपण माहिती करून घेतले. अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी खालील तक्ता नीट पाहा.
कर्ज घेण्यासाठी पात्रता काय?
पीपीएफ खाते: हे खाते उघडल्यानंतर तिसर्या आणि सहाव्या वर्षी एकूण फंडावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. पीपीएफ (PPF) खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेच्या 25 % पर्यंत कर्ज उपलब्ध होते.
ईपीएफ खाते: एखादा कर्मचारी सात वर्षांच्या सेवेनंतर त्याच्या खात्यातील एकूण रकमेच्या 50% पर्यंत विवाह आणि शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो. 10 वर्षांच्या सेवेनंतर, तो त्याच्या EPF खात्यात ठेवलेल्या रकमेच्या 90% पर्यंत कर्ज सहज घेऊ शकतो.
जीपीएफ खाते: सरकारी कर्मचारी त्याच्या GPF खात्यातील निधीतून नोकरीच्या संपूर्ण कार्यकाळात कधीही कर्ज घेऊ शकतो.
करात सवलत मिळते का?
पीपीएफ खाते: पाच वर्षांनंतर एखाद्या कर्मचाऱ्याने जर त्याच्या EPF खात्यातून उर्वरित रक्कम काढली, तर ती रक्कम करमुक्त असते.
ईपीएफ खाते: आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कर कपातीचा लाभ घेतला जाऊ शकतो. 1.5 लाख रुपयांपर्यंतची वार्षिक गुंतवणूक ही करमुक्त असते.
जीपीएफ खाते: GPF ही मुळातच करमुक्त सेवानिवृत्ती बचत योजना आहे.