विमान प्रवासाची तिकीटे बुक करून बरेच जण शेवटच्या क्षणी ती रद्द करतात. यामुळे प्रवाशांचे नुकसान तर होतेच. पण त्याचबरोबर विमानकंपन्यांचेही मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी विमान कंपन्यांनी एक युक्ती लढवली आहे. या कंपन्या आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री करतात. अशावेळी काही प्रवाशांनी तिकीट रद्द केले तर विमान कंपन्या जास्तीच्या तिकिट विक्रीतून हे नुकसान भरून काढतात किंवा होणाऱ्या नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करतात. पण या प्रक्रियेमुळे प्रवाशी आणि विमान कंपनी यांच्यात नेहमीच वाद होताना दिसून येतो. हा वाद लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने पुढाकार घेतला असून, अशा परिस्थितीत विमान कंपनीला तिकिटाची संपूर्ण रक्कम प्रवाशांना परत करण्याची सूचना केली आहे.
विमान कंपन्या अशी करतात पैशांची बचत
विमानाचे तिकीट बुकिंग करूनही सीट मिळाली नाही तर कंपनीला टेक ऑफ टाईमच्या तासाभरात पर्यायी फ्लाईटची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. कंपनीकडून अशी सुविधा उपलब्ध झाली नाही तर प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागते. मात्र विमान कंपन्यांनी यातूनही पळवाट काढली आहे. विमान कंपन्या पर्यायी विमान देण्याऐवजी त्या प्रवाशांना अर्धवट पैसे देऊन निराश करत आहेत.
1,119 प्रवाशांना मिळाला अपेक्षेपेक्षा कमी मोबदला
मे 2022 मध्ये विमान कंपन्यांनी प्रवास नाकारलेल्या प्रवाशांची संख्या 1,119 इतकी होती, एका अहवालानुसार याकालावधीत विमान कंपन्यांनी प्रवाशांना कमी मोबदला दिला . उदाहरणार्थ, अलायन्स एअरने प्रति प्रवासी सरासरी 250 रुपयांपेक्षा कमी मोबदला दिला आहे. यातून हे स्पष्ट होते की, या विमान कंपन्यांनी डीजीसीएच्या नियमांची पायमल्ली केली आहे.
2022 मध्ये डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला दंड
बहुतेकवेळा एअरलाईन्सला थोड्या पैशांसाठी आपली जागा सोडण्यास तयार असलेले प्रवासी मिळतात किंवा या प्रवाशांना एअरलाईन तासाभरात दुसऱ्या विमानात या प्रवाशांना जागा उपलब्ध करून देतात. यामुळे अशा प्रवाशांना भरपाई देण्याची आवश्यकता नसते. गेल्या वर्षी, डीजीसीएने एअर इंडियाला तिकीट रद्द केलेल्या प्रवाशांना भरपाई न दिल्याबद्दल दंड ठोठावला होता. एअर इंडियाकडेही अशा पेमेंटसाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            