राजधानी दिल्लीसह (New Delhi) उत्तर भारतात थंडीचा तडाखा (Cold Wave) अजूनही सुरूच आहे. आणि त्यामुळे कालच्या एका दिवसांत 260 रेल्वे फेऱ्या (Railwat Disrupted) रद्द कराव्या लागल्या. तर 30 विमान सेवांवरही (Air Traffic) परिणाम झाला. दिल्लीत सफदरजंग आणि पालम भागात दृश्यता 25 मीटर इतकी कमी होती. त्यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचं भारतीय रेल्वेनं कळवलं आहे.
‘82 एक्सप्रेस गाड्या, 140 पॅसेंजर गाड्या तसंच 40 सब-अर्बन रेल्वे सेवा रद्द कराव्या लागल्या,’ असं रेल्वेनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रविवारी 335 त्या वर रेल्वे सेवा रद्द झाल्या होत्या. त्या मानाने आता परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
सफदरजंग भागात दिल्लीतलं प्रमुख हवामान केंद्र आहे. तिथं सकाळी नऊ वाजता दृश्यता 25मीटर इतकी होती. तर पालम, जिथं विमानततळ आहे, दृश्यता 50 मीटर इतकी होती. त्यामुळे विमान सेवाही विस्कळीत झाली. सोमवारी दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांसाठी एक पत्रक काढून विमान सेवांची सविस्तर माहिती दिली आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यता साधारण 50 मीटर इतकी होती. त्यामुळे 30 दिल्लीला जाणारी विमानतळं इतर ठिकाणी उतरवण्यात आली. तर काही विमानं विलंबाने पोहोचत होती.
सकाळी साडे आठ वाजता सफदरजंग हवामान केंद्रावर 1.9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी 2018 पासूनचा हा हवामानाचा नीच्चांक आहे. उद्यापासून (12 जानेवारी) दिल्लीतला थंडीचा तडाखा हळू हळू कमी होईल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.
हरयाणामध्ये बर्फवृष्टी
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांमध्ये आज (11 जानेवारी) बर्फवृष्टी झाली. पण, काश्मीरसाठी बर्फवृष्टी ही तशी नवलाईची गोष्ट नाही. पण, दिल्लीच्या जवळ हरयाणामध्येही यंदा थंडीच्या लाटेमुळे स्थानिक लोकांना बर्फवृष्टीचा अनुभव घेता आला. हरयाणाच्या बरवाला जिल्ह्यात झालेल्या बर्फवृष्टीचे व्हीडिओ सध्या ट्विटरवर फिरत आहेत.
हरयाणा आणि चंदिगडच्या काही भागांमध्ये सकाळी दाट धुकं आणि चक्क बर्फवृष्टीही झाली. त्यामुळे थंडीची लाट असतानाही काहींना त्याचाही आनंद लुटता आला.