भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी सरकारला सर्वच क्षेत्रांमध्ये भरीव आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करतील. या बजेटमध्ये पायाभूत सेवा क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
कोरोना संकटाची दोन वर्ष, स्थलांतरित कामगारांची झालेली परवड आणि कच्च्या मालाच्या किंमतीत महागाईने पायाभूत सेवा क्षेत्रांच्या वाढीला ब्रेक लागला आहे. सरकारने गेल्या पाच वर्षात पायाभूत सेवा क्षेत्राला झुकतं माप देत भरीव तरतूद केली होती. मात्र अजून हे क्षेत्र पूर्णपणे विकसित झालेले नाही. आगामी बजेटमध्ये रेल्वे, रस्ते , महामार्ग आणि विमान सेवा या क्षेत्रांच्या प्रचंड अपेक्षा आहेत.
सरकारने रेल्वेच्या आधुनिकीकरणाला प्रायोरिटी दिली आहे. त्यानुसार आगामी बजेटमध्ये रेल्वेसाठी मोठी तरतूद केली जाईल. तेजस हमसफर, वंदे भारत या गाड्यांच्या संख्येत वाढ करणे आणि त्यांचे नवे मार्ग सुरु करणे, विस्टाडोम कोचेसची संख्या वाढवणे, रेल्वे स्टेशनांचा विकास आणि अत्याधुनिक सुविधा, इलेक्ट्रिफिकेशन आणि रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण यासाठी यंदाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद केली जाईल. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.40 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
रस्ते आणि महामार्ग क्षेत्र आर्थिक विकासात महत्वाचा घटक आहे. मागील तीन वर्ष अर्थव्यवस्था कोव्हीड आणि मंदीशी सामना करत होती. आता या संकटातून अर्थव्यवस्था सावरली आहे. विकासाला चालना देण्यासाठी रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणे आवश्यक आहे. खेडी आणि औद्योगिक वसाहती, बंदरे यांना जोडणारे नवे रस्ते, महामार्ग तयार करणे, रस्ते सुरक्षेबाबत भरीव तरतूद अपेक्षित आहे. त्याशिवाय या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी इन्व्हीटच्या माध्यमातून निधी उभारण्याला सरकारकडून प्राधान्य दिले जाईल. टोल ऑपरेट ट्रान्सफर सारख्या योजनांची घोषणा बजेटमध्ये होण्याची शक्यता आहे.
कोराना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राला यंदा बजेटकडून मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. कोरोना काळात विमान कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला होता. अजून विमान सेवा क्षेत्राने कोरोनापूर्व स्थिती गाठलेली नाही. हवाई इंधन शुल्काबाबत तसेच सरकारी मालकीच्या विमानतळांचा खासगी विकास किंवा भाडे कराराने देण्याविषयीचे धोरण याबाबत यंदा बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. उडानअंतर्गत नवीन विमान सेवांची घोषणा, विमानतळांचा विकास याविषयी तरतूद वाढवली जाण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांत इन्फ्रा सेक्टरसाठीच्या बजेटमध्ये झाली प्रचंड वाढ
पायाभूत सेवा क्षेत्रासाठीची मागील पाच वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता बजेटमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वर्ष 2017 मध्ये रेल्वेसाठी 55000 कोटींची तरतूद करण्यात आली होती. वर्ष 2022 मध्ये रेल्वेसाठीचे बजेट 1.4 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आले. रस्ते आणि महामार्गांसाठी 2017 मध्ये 64900 कोटींची तरतूद करण्यात आली होती तो आकडा 2022 च्या बजेटमध्ये 1.99 लाख कोटींपर्यंत वाढला होता. हवाई वाहतूक सेवेसाठी सरकारने 2017 च्या अर्थसंकल्पात 2702 कोटींची तरतूद केली होती. वर्ष 2022 मध्ये यात पाचपटीने वाढ झाली आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठीचे बजेट 10667 कोटी इतके वाढवण्यात आले.