गेल्या तीन महिन्यांत तुर डाळीच्या किंमतीत जवळपास 22% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तूर डाळीचा देशांतर्गत पुरवठा कमी झाल्यामुळे ही भाववाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. अवकाळी पावसाचा फटका तूर पिकाला बसला आहे. सोबतच गेल्या हंगामात तूर पिकाची लागवड देखील कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत तूरडाळीच्या भावात 32% वाढ नोंदवली गेली असून गेल्या तीन महिन्यांत 22% भाववाढ पाहायला मिळाली आहे. याचा मोठा फटका सामान्य जनतेला बसतो आहे. तूर डाळ ही सर्वसामान्य घरांमध्ये रोजच खाल्ली जाते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डाळीच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्य जनता मात्र हैराण आहे.
8400-8500 रुपये क्विंटलचा भाव
तूरडाळ उत्पादनात देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. देशभरात महाराष्ट्रातून तूर डाळ पुरवली जाते. मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. यावर्षी जवळपास 20% तूर डाळीचे उत्पन्न घटले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तूरडाळीची प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत (MSP) ही 6600 रुपये असून सध्या बाजारात 8400-8500 प्रति क्विंटल दराने तूर डाळ विकली जात आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी भाववाढ असल्याचे म्हटले जात आहे.
? Take strict action against traders not making full disclosure about tur dal stocks: Centre to states pic.twitter.com/6mUEX2A28o
— MegaNews Updates (@MegaNewsUpdates) April 12, 2023
साठीबाजांवर कारवाईचे संकेत!
तूरडाळीचा देशांतर्गत पुरवठा असाच कायम राहिला तर येत्या काही महिन्यांत अतिरिक्त 10% भाववाढ होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे साहजिकच स्वयंपाकघरातला खर्च महागणार आहे. येणाऱ्या काळात 9300-9500 रुपये प्रति क्विंटल तूर विकली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उन्हाळ्यात लग्नसराईचा हंगाम देखील जोरात असतो. आधीच महागाईने हैराण असलेल्या सामान्य नागरिकांना आता लग्नकार्यात तूरडाळीचा देखील विचार करावा लागणार आहे.अशातच तूर आणि उडद डाळीची साठेबाजी होत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. यावर सरकारने देखील कारवाईचा इशारा दिला आहे. स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर तूरडाळींचा साठा व्यापारी,आयातदार यांनी लवकरात लवकर जाहीर करावा असे सरकारने म्हटले आहे.माहिती लपवल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असेही सरकारने म्हटले आहे.
तुरीचे उत्पादन 2.8 दशलक्ष टन राहू शकते
तूर डाळीचे उत्पादन 2022-23 (जुलै-जून) या पीक वर्षात 3.7 दशलक्ष टनांपर्यंत कमी होऊ शकते असा अंदाज आहे. स्वतः कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागील वर्षी याच हंगामात तुरीचे उत्पादन 4.2 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. परंतु व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे की येत्या पीक वर्षात 2.7-2.8 दशलक्ष टन तुरीचे उत्पादन होऊ शकते.