SIP Calculator: सिस्टेमॅटिक गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला विशेष काही करायची गरज नाही. पण नियमित गुंतवणुकीचा नियम मात्र तुम्हाला पाळावा लागेल. चला मग पाहुया 1 कोटी रुपयांचा फंड कसा तयार करायचा.
श्रीमंत तर प्रत्येकाला व्हायचं आहे आणि यासाठी मेहनतसुद्धा आपल्यालाच करावी लागणार आहे. आपल्या मेहनतीशिवाय आणि गुंतवणुकीशिवाय इतर कोणीही आपल्याला करोडपती करू शकणार नाही. तुम्हाला वाटेल मेहनत आणि गुंतवणूक तर आम्ही करतच आहोत. त्यात नवीन काय आणि यातून करोडपती कसं होऊ शकतो.
तर मित्रांनो, खरंच श्रीमंत होण्यासाठी मेहनत तर करावीच लागते आणि त्या मेहनतीने कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला तर तुम्ही नक्कीच श्रीमंत काय करोडपतीसुद्धा होऊ शकता. तर आज आपण अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर नक्की फायदा होऊ शकतो. आपण म्यु्च्युअल फंडमधील इक्विटी स्कीमबद्दल बोलत आहोत. या स्कीमवर वर्षाला सरासरी 12 टक्क्यापर्यंत परतावा मिळतो.
SIP Investment
Mutual Fund Investment
म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जून 2023 मधील म्युच्युअल फंडमधील एसआयपीद्वारे झालेल्या गुंतवणुकीचा ओघ पाहिला असता ती 14 हजार कोटींहून अधिक असल्याचे दिसून येते. यामध्ये किमान रकमेपासून गुंतवणूक करता येते. तसेच यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडमधील इक्विटी स्कीमवर 12 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. इतके सर्व फायदे म्युच्युअल फंडमधील एसआयपीमधून गुंतवणूकदाराला मिळतात. काही फंडांमध्ये महिन्याला अवघे 100 रुपये भरूनही गुंतवणूक करता येते. इतकी फ्लेक्सीब्लिटी एसआयपीमध्ये आहे.
100 रुपयांत 1 कोटी रुपयांचा फंड
एसआयपीमधील गुंतवणुकीत तुम्ही प्रत्येक महिन्याला, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने गुंतवणूक करू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाला किंवा आठवड्यालादेखील गुंतवणूक करू शकता. प्रत्येक दिवसाचे 100 रुपये म्हणजे एका महिन्याचे 3000 रुपये होतात. या 3 हजार रुपयांवर वर्षाला 12 टक्के व्याज पकडले तर तुम्ही 30 वर्षांत जवळपास 1,05,89,741 रुपयांचा निधी उभारू शकता. या 30 वर्षांतील तुमची गुंतवणूक ही 10,80,000 रुपये इतकी राहील. त्यावर तुम्हाला 30 वर्षांच्या गुंतवणुकीतून चक्रवाढ पद्धतीने 95,09,741 रुपयांचे परतावा मिळू शकतो.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक मार्केट जोखमीच्या अधीन
म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे केलेली गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. त्यातून वरीलप्रमाणेच परतावा मिळेल याची कोणतीही हमी म्युच्युअल फंड हाऊस देत नाहीत. पण म्युच्युअल फंडमधील इक्विटी फंडांची मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता. त्यांनी दिलेला परतावा बऱ्यापैकी असल्याचे दिसून येते. एसआयपीमुळे गुंतवणूकदाराला वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा लाभ घेता येतो. कारण मार्केटमधील परिस्थिती ती दररोज वेगवेगळी असते. त्याचा परिणाम म्युच्युअल फंडवरही त्याचप्रमाणे होत असतो. त्यामुळे मार्केटमधील चढ-उताराचा लाभ गुंतवणूकदाराला काहीही न करता मिळतो.
अशाप्रकारे तुम्ही दररोजच्या गुंतवणुकीतूनही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंडमधील अनेक फंड हाऊस दररोजच्या एसआयपीचा पर्याया देतात. पण त्यांचे नियम कंपनीनुसार वेगवेगळे असू शकतात.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)