भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आपल्या देशात आता अशी एक ट्रेन सुरु झाली आहे जी एका खासगी कंपनीद्वारे चालवली जाते. या रेल्वेसाठी इंडियन रेल्वेचा लोहमार्गच वापरला जातो मात्र त्याची व्यवस्था एका खासगी कंपनीद्वारेच चालवली जाते. देशात धावणारी पहिली खासगी ट्रेन कुठली, तिचे नाव काय? ती कुठल्या मार्गावर धावते? तिचे प्रवासभाडे किती? अशी अनेक प्रश्न तुम्हांला पडली असतील. खरे तर अनेक भारतीयांना याबद्दल माहिती नाही.चला तर जाणून घेऊया या स्पेशल ट्रेनबद्दल सविस्तर बातमी.
‘भारत गौरव एक्सप्रेस’
भारतातील पहिल्या-वाहिल्या खाजगी रेल्वेचे नाव आहे ‘भारत गौरव एक्सप्रेस’. या ट्रेनबद्दल गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे ऐकत आहोत, मात्र ही ट्रेन इंडियन रेल्वेद्वारे चालवली जात नसून ती ‘साऊथ स्टार रेल’ (South Star Rail) नावाच्या एका खासगी कंपनीद्वारे चालवली जात आहे. ही ट्रेन ‘भारत गौरव योजने’अंतर्गत जून 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा स्थळांना भेट देता यावी या उद्देशाने या ट्रेनचा मार्ग आणि यात्रा डिजाईन करण्यात आली आहे.
Bookings in full swing for Coimbatore to Shirdi train trip (27-10-2022). Hurry Up Now !
— South Star Rail (@SouthStarRail) October 18, 2022
website: https://t.co/o7h7VFqbtG
Toll Free Number: 1800 210 2991@SaiDevotees @SaiDevotesWorld @saibabamilk @shiridisairam1 @THChennai @instagram @InstagramComms pic.twitter.com/UFYhOI5XH8
कुठल्या मार्गावर धावते ही ट्रेन?
भारतातील ही पहिली खाजगी रेल्वे सेवा तामिळनाडूमधील कोईम्बतूर नॉर्थ स्टेशन ते महाराष्ट्रातील साईनगर शिर्डी दरम्यान धावते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या भारत गौरव योजनेअंतर्गत मागील वर्षी 14 जून रोजी ही ट्रेन सुरू झाली. विशेष म्हणजे ‘साऊथ स्टार रेल’ ही ट्रेन फक्त पर्यटकांसाठी भाडेतत्त्वावर चालवली जाते. जोस चार्ल्स मार्टिन (Jose Charles Martin) हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
ही ट्रेन कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत धावते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज ही ट्रेन पर्यटकांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेते. या ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी खास पॅन्ट्री कार आहे. इंडियन रेल्वेच्या नियमित भाड्यापेक्षा या ट्रेनचे दर अधिक आहेत. फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी आणि स्लीपर अशा श्रेणींमध्ये नागरिकांना तिकीट बुक करता येणार आहे. स्लीपर ट्रेनच्या प्रवासासाठी 6,300 रुपये, थर्ड एसीसाठी 10,080 रुपये, सेकंड एसीसाठी 12,600 रुपये तर फर्स्ट एसीसाठी 18,000 रुपयांचे प्रति व्यक्ती ट्रेन तिकीट असणार आहे.
कंपनीने नुकतीच कोईम्बतूर ते काश्मीर ही ट्रेन यात्रा देखील जाहीर केली आहे. सुमारे 41,000 रुपयांपासून तिकिटांचे बुकिंग प्रवाशांना करता येणार आहेत.