बायजू या देशातल्या आघाडीच्या एडटेक कंपनीने अल्पावधीत देशातली एक प्रमुख एडटेक कंपनी म्हणून स्थान मिळवलं. आणि कोव्हिडच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व वाढल्यावर तर कंपनीची उलाढालही वाढली. त्या जोरावर दक्षिण भारतातल्या या कंपनीने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरही नाव मिळवलं. म्हणजे क्रिकेट नियामक मंडळाबरोबर करार करून त्यांनी जर्सीसाठी प्रायोजकत्व स्वीकारलं.
पण, आता बायजू कंपनीला या करारातून बाहेर पडायचं आहे असं समजतंय. कंपनीच्या विपणन विभागाने बीसीसीआयला पत्र लिहून प्रायोजकत्वातून माघार घ्यायची असल्याचं कळवलंय असं सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांनी म्हटलंय. येत्या 21 डिसेंबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. आणि या बैठकीत बायजूच्या प्रस्तावावर चर्चा होईल असा अंदाज आहे.
बीबीसीआयमधल्या सूत्रांनीही बायजूकडून आलेल्या पत्राची दखल घेतली आहे. आणि प्रायोजकत्वाच्या कराराचं पालन होत असेल तर बायजूच्या प्रस्तावाचा विचार करण्याची तयारी दाखवलीय.
सध्या बायजूचा बीबीसीआयबरोबरचा करार हा नोव्हेंबर 2023 पर्यंतचा आहे. पण, कंपनीला आर्थिक वर्षं 2021-22मध्ये 4,500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे खर्चावर अंकुश ठेवण्याचं कंपनीचं धोरण आहे. आणि त्याासाठी प्रसिद्धीवरचा खर्च कंपनीला कमी करायचा आहे.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बायजू कंपनीने प्रायोजकत्वाच्या करारारतील 82 कोटी रुपयांची रक्कम बीसीसीआयला दिली नसल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. पण, कंपनीने लिंक्डइनवर एक भलीमोठी पोस्ट लिहून बीसीसीआयला कराराचे सगळे पैसे दिल्याचं स्पष्ट केलं होतं.