पुढील काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट मांडणार आहेत. निवडणुकीआधीच सरकारचं हे शेवटचं बजेट असल्याने सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील. विशेष म्हणजे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. बजेटच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास या लेखातून जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
जेएनयूतून पूर्ण केले शिक्षण
निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला तामिळनाडूच्या मदुराई येथे झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेत, तर आई गृहिणी होत्या. वडिलांच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे त्यांचे शिक्षण देखील वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
त्यांनी मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि M.Phil पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जेएनयू शिक्षण घेताना ओळख झालेल्या परकला प्रभाकर यांच्याशी पुढे जाऊन त्यांनी लग्न केले.
लंडनमध्ये त्यांनी होम डेकोर स्टोरमध्ये सेल्सगर्ल म्हणून देखील काम केले. याशिवाय, बीबीसी रेडिओसाठी ट्रान्सलेटर म्हणूनही काम केले.
राजकीय प्रवास
निर्मला सीतारामन यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्याआधी 2003 ते 2005 या कालावधीत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. 2010 साली पक्षाकडून राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना देशभरात ओळख मिळाली. पुढे 2014 साली पक्षाने आंध्रप्रदेशमधून त्यांना राज्यसभेवर तर पाठवलेच सोबतच मंत्रीपद देखील दिले. त्यानंतर 2016 साली त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले.
पहिल्या महिला संरक्षणमंत्री ते अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांना भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. याआधी ही दोन्ही पदे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांभाळली आहेत. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पंतप्रधानपद देखील होते.
डिसेंबर 2017 मध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या 2017 ते 2019 पर्यंत या पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर मे 2019 मध्ये देशाच्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्विकारला.
सलग सहाव्यांदा सादर करणार बजेट
निर्मला सीतारामन यांचा समावेश जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत होतो. फॉर्ब्सनुसार, जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत त्या 32व्या स्थानी आहेत. त्या यावर्षी सलग सहाव्यांदा बजेट सादर करतील. 5 जुलै 2019 ला त्यांनी आपले पहिले बजेट सादर केले होते.
गेल्याकाही वर्षात बजेट सादर करताना त्यांनी अनेक प्रचलित पद्धती देखील मोडीत काढल्या आहेत. पहिल्यांदा पेपरलेस बजेट त्यांनीच मांडले होते. सलग 2 तास 40 मिनिटे बजेट सादर करण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे. याशिवाय, बजेटची कागदपत्रे सुटकेसऐवजी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या लाल रंगाच्या कापडात संसदेत आणण्यास सुरुवात केली.