मुंबईकरांनी महापालिकेच्या बजेटमध्ये अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. बजेट तयार करण्यापूर्वी पालिकेकडून सामान्य मुंबईकर आणि लोकप्रतिनिधींकडून सूचना प्रस्ताव मागवते. यंदा हजारो सूचना पालिकेला बजेटसंदर्भात प्राप्त झाल्या आहेत. पालिका क्षेत्रातील खडेमुक्त रस्ते, गटारे, वायू प्रदूषण, फेरिवालामुक्त फूटपाथ, सुशोभिकरणाबाबत नागरिकांनी पालिकेला सूचना पाठवल्या आहेत. येत्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई महापालिकेचे बजेट सादर केले जाणार आहे.
पालिकेला ई-मेल आणि पत्रांच्या माध्यमातून हजारो सूचना प्राप्त झाल्या आहेत. बजेटमध्ये पालिकेने खडेमुक्त रस्ते आणि शहरांच्या नियोजनासाठी पुरेसी तरतूद करावी, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे. याशिवाय यंदा कोणतीही करवाढ नसावी अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. जवळपास 27% मुंबईकर डायबेटिजग्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने आरोग्य क्षेत्राला प्राधान्य द्यायला हवे अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत. मागील काही दिवस मुंबई शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खराब झाल्याचे दिसून आले होते. यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने तातडीने एअर प्युरिफायर्स टॉवर्स उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
फूटपाथ मोकळे करा (Free Footpath from Hawkers)
पालिकेने फूटपाथ फेरिवालामुक्त करावेत, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे. शहर आणि उपनगरातील शेकडो फुटपाथ फेरिवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बेकायदा फेरिवाल्यांवर कठोर कारवाई करुन फूटपाथ मोकळे करावेत, अशी मागणी देणारे पत्रे पालिकेला नागरिकांनी पाठवली आहेत.
स्वच्छ सुंदर मुंबईसाठी नागरिक आग्रही
पालिकेच्या गार्डन्समध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय शहराच्या सुशोभिकरणासाठी भक्कम निधीची अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. शहर आणि उपनगरातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने असावेत यासाठी पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.