Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Group : टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलची मोठी ऑफर! 4G सेवेत असणार महत्त्वाची भूमिका

Tata Group : टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलची मोठी ऑफर! 4G सेवेत असणार महत्त्वाची भूमिका

Tata Group : बीएसएनएलच्या 4G सेवेत लवकरच सुधारणा होणार आहे. टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलनं ऑर्डर दिलीय. देशभरात 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठीची ही ऑफर आहे. बीएसएनएल ही सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे.

भारत संचार निगम लिमिटेडनं (Bharat Sanchar Nigam Limited) टाटा ग्रुपची आयटी क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी टीसीएसला (Tata Consultancy Services) मोठी ऑर्डर दिलीय. 15,000 कोटी रुपयांची आगाऊ खरेदी ऑर्डर देण्यात आलीय. भारत सरकारच्या मालकीची कंपनी असलेली बीएसएनएल ही एक टेलिकॉम (Telecom) क्षेत्राशी निगडित कंपनी आहे. दूरसंचार सेवा देशभर पोहोचविण्यात बीएसएनएलचा मोठा वाटा आहे. आता बीएसएनएल लवकरच 4G नेटवर्कही आणणार आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून कंपनीनं टीसीएसला म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कन्सोर्टियमला (Tata Consultancy Services Consortium) 15,000 कोटी रुपये दिले आहेत. झी बिझनेसनं याविषयीचं वृत्त दिलंय.

इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स करणार टीसीएस

भारत संचार निगम लिमिटेडनं देशात 4G लॉन्च करण्याची तयारी सुरू केलीय. याच वर्षी बीएसएनएलची 4G सेवा सुरू होईल, हे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यासाठी कंपनीनं टीसीएसला खरेदी आदेश जारी केलाय. ही खरेदी ऑर्डर जवळपास 15000 कोटींची आहे. बीएसएनएलच्या 4G नेटवर्कमध्ये टीसीएस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याकामी टीसीएस 1 लाख साइट्सवर इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स करणार असल्याचं समजतंय. बीएसएनएलच्या बोर्डानं फेब्रुवारीमध्ये टीसीएस नेतृत्वाखालच्या कन्सोर्टियमकडून विविध उपकरणांसाठी सुमारे 24,500 कोटी रुपयांचा करार मंजूर केला. आता याचसंबंधी कंपनीनं टीसीएसला अधिकृत आदेश जारी केलाय. टीसीएसनं एक्स्चेंजला ही माहिती दिली.

tata

बीएसएनएलच्या 200 साइट्सवर इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, की बीएसएनएलच्या 200 साइट्सवर इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालंय. त्यासंदर्भात चाचणीदेखील सुरू करण्यात आलीय. पुढच्या दोन-तीन महिन्यांत ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. यानंतर दररोज साधारणपणे 200 साइट्सच्या आधारे पुढे जाण्याचं नियोजन असणार आहे. बीएसएनएल 4G ऑटोमॅटिकली 5Gवर अपग्रेड केलं जाऊ शकणार आहे. करारानंतर बीएसएनएल एक फायदेशीर आणि मजबूत अशी दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

5Gवर होणार अपग्रेड

बीएसएनएलनं आता टीसीएसला ऑर्डर दिलीय ती 4G सेवेसाठी. मात्र येत्या काळात बीएसएनएल 5G सेवाही सुरू करणार आहे. 2024पर्यंत बीएसएनएल 5G सेवा सुरू करेल, असं अश्विनी वैष्णव यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला 4G नेटवर्क आणण्यासाठी टीसीएस आणि सी-डॉटच्या नेतृत्वाखालच्या कन्सोर्टियमला शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. या करारांतर्गत ऑर्डर दिल्याच्या तारखेपासून सुमारे एका वर्षात ते 5Gवर अपग्रेड केलं जाणार आहे.

सार्वजनिक उपक्रम

बीएलएनएल हा एक सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे. देशव्यापी दूरसंचार नेटवर्कच्या माध्यमातून मोबाइल व्हॉइस आणि इंटरनेट सेवा प्रदान करणारी एक कंपनी आहे. बीएसएनएल ही भारतातली ही सर्वात मोठी सरकारी मालकीची वायरलेस दूरसंचार सेवा प्रदाता आहे. बीएसएनएलतर्फे बीएसएनएल मोबाइल, बीएसएनएल लँडलाइन, बीएसएनएल ब्रॉडबँड, इंटरनेट, बीएसएनएल भारत फायबर, भारत नेट, बीएसएनएल विंग सर्व्हिस अशा सेवा उपलब्ध आहेत. त्यात आता 4G आणि 5G या सेवांची भर पडणार आहे.