Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Options: नवविवाहित महिलांसाठी गुंतवणुकीचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट

Investment

Image Source : https://www.freepik.com/

नवविवाहित महिलांनी गुंतवणुकीचा विचार करताना कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न व खर्च या गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच, म्युच्युअल फंड, घर, सोने हे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

भारतात लग्न समारंभात लाखो रुपये खर्च केले जातात. अनेकजण कर्ज काढून धुमधडाक्यात देखील लग्न करतात. यामुळे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडप्यांपुढे आर्थिक नियोजन व गुंतवणुकीला कशी सुरुवात करावी ? असा प्रश्न निर्माण होतो. 

प्रामुख्याने नवविवाहित महिलांकडे नवीन घराची जबाबदारी येत असते. नवीन घरातील आर्थिक निर्णयामध्ये देखील त्यांचा सहभाग वाढतो. अशात नक्की कशाप्रकारे व कशात गुंतवणूक करायची असा प्रश्न नवविवाहित महिलांना पडतो. या लेखातून नवविवाहित महिलांनी गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवाव्यात व कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, याविषयी जाणून घेऊया. 

गुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

लग्नानंतर गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या नवविवाहित महिलांना काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन घराची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने आर्थिक नियोजन योग्यप्रकारे करणे गरजेचे असते. कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न, घरातील खर्च या आधारावर गुंतवणुकीचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते.

याशिवाय, नवविवाहित महिला नोकरी करत असतील तर गुंतवणुकीची जास्त संधी असते. महिलांनी भविष्यात कुटुंबातील सदस्यांची वाढणारी संख्या, लहान मुलांचे शिक्षण या गोष्टी देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच, घर-गाडी खरेदी करायची असल्यास दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करावी.

नवविवाहित महिलांसाठी हे आहेत गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

म्युच्युअल फंड 

नवविवाहित महिलांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामागचे कारण म्हणजे अनेक महिलांना लग्नाच्या निमित्ताने अथवा इतर कारणाने काही कालावधीसाठी नोकरी सोडावी लागते. मात्र, नोकरी नसतानाही तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून कमीत कमी गुंतवणुकीत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

महिला त्यांच्या आर्थिक उद्देष्टांच्या आधारावर  Equity, Debt अथवा Hybrid Funds मध्ये गुंतवणूक करू शकतात.  Equity Linked Savings Scheme मध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलत देखील मिळते.

पीपीएफ 

दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार असल्यास पीपीएफ ( Public Provident Fund ) चांगला पर्याय आहे. या गुंतवणुकीवर जवळपास 7.1 टक्के व्याज मिळते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी हा 15 वर्ष असतो. याशिवाय, कर सवलत देखील मिळते. त्यामुळे तुम्ही जर निवृत्तीच्या उद्देशाने गुंतवणूक करत असाल तर पीपीएफ चांगला पर्याय आहे.

रिअल इस्टेट 

रिअल इस्टेट सारखी कोणतीही सुरक्षित गुंतवणूक नाही, असे प्रामुख्याने समजले जाते. कारण, मालमत्तेची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास रिअल इस्टेटचा विचार करू शकता. तुम्ही स्वतःसाठी घर खरेदी करू शकता. गुंतवणुकीसाठी हा निश्चितच चांगला पर्याय आहे. 

सोने 

सोन्याकडे गुंतवणुकीचा शेवटचा पर्याय म्हणून पाहायला हवे. कारण, लग्नाच्या निमित्ताने तुम्ही आधीच भरपूर दागिने खरेदी केले असण्याची शक्यता आहे.. त्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करू शकता. यातून मिळणारा परतावा हा इतर गुंतवणुकीच्या तुलनेत कमी असतो. मात्र, यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते हे देखील विसरता कामा नये. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील काही रक्कम सोने खरेदी करण्यासाठी निश्चितच वापरू शकता. भविष्यात हीच गुंतवणूक उपयोगी ठरेल.

लक्षात ठेवा की, सोने, म्युच्युअल फंड, पीपीएफ व्यतिरिक्त गुंतवणूक करताना इतरही गोष्टींचा विचार करायला हवे. भविष्यात कोणती समस्या निर्माण होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपतकालीन निधीत गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. याशिवाय, स्वतःला व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा विचार करून विमा काढणे गरजेचे आहे.