आजकाल एसआयपीचे (SIP ) प्रस्थ वाढत चालले आहे. तुम्हाला नोकरी लागताच बहुतेक वेळा कुणा ओळखीच्याकडून पहिला प्रश्न हा विचारला जातो की, SIP सुरू केली आहे का? SIP चे तर किती जोरदार मार्केटिंग झाल आहे, याविषयी 1-2 महिन्यापूर्वीचा एक गमतीशीर अनुभव याठिकाणी शेअर करावासा वाटतो.
नवी नोकरी लागल्याने आम्ही मित्र गुंतवणूक कुठे करावी, यावर चर्चा करत होतो. म्युच्युअल फंडवर बोलायला लागताच, माझा एक मित्र पटकन बोलून गेला की, ‘’म्युच्युअल फंड वगैरे काही नको. मी SIP सुरू करणार आहे. आजकाल हेच सगळ्यात बेस्ट आहे.’’ म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे काय, हे ज्यांना महितेय ते गालातल्या गालात माझ्या मित्राच्या financial literacy वर हसले असतील. बर, माझा हा मित्र काही एवढ्यावर थांबला नाही. त्याने तर SIP मध्ये गुंतवणूक न करणाऱ्या माझ्या तिथे असलेल्या दुसऱ्या मित्राला आर्थिक निरक्षर देखील ठरवून टाकले. आता बोला!
पण, खरंच म्युच्युअल फंड, शेअर मार्केट यात गुंतवणूक न करणारा आर्थिक निरक्षर असतो का हो? जर नसेल तर SIP वगैरे पद्धतीने केली जाणारी ही गुंतवणूक वाईट आहे का, याविषयी थोड खोलात शिरून चर्चा करुया. तसाही आज आजपासून आर्थिक साक्षरता सप्ताह (13 ते 17 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. आणि यावर्षीची थीमही “Good Financial Behaviour - Your Saviour” ही आहे.
Table of contents [Show]
गुंतवणूकीचा विचार करताना जोखीम महत्वाची ठरते!
हेडिंगमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर द्यायचे तर ते म्हणजे, ‘नाही!’ शेअर मार्केट किवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक न करणाऱ्याना आर्थिक निरक्षर निश्चितपणे म्हणता येणार नाही. खाली पहा, गुंतवणूकीचे किती विविध प्रकार आहेत?
ही यादी आणखीही वाढवता येईल. आता यातला प्रत्येक गुंतवणूकीचा प्रकार सारखाच जोखीमयूक्त (रिस्की) आहे का? तर नाही. यातला पब्लिक प्रॉव्हीडंट फंड घेतलात तर तो तुम्हाला खात्रीशीर परतावा (रिटर्न) देतो. फिक्स डीपॉझिटचेही तसेच आहे. पण यातल्या शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे. अगदी तुम्हाला कुणी असे सांगितले की, ‘अमुक अमुक अशा शेअर्सची किमत वाढणार म्हणजे वाढणारच आहे.’ तरी ती व्यक्ति तसे लेखी लिहून द्यायला तयार होईल का, ‘मी म्हणतो तस झाल नाही तर तो सगळा लॉस मी स्वीकारीन,’ अस सल्ला देणारा म्हणेल का? तर, नाही, असे अजिबातच म्हणणार नाही. कारण तुम्ही एखाद्या स्टॉकचा फंडामेंटल अभ्यास करून हा स्टॉक चांगला आहे, अस नक्की केलत तरी कंपनीच्या अंतर्गत बाबी तुम्हाला माहीत असतात का? अचानक काहीतरी घडते आणि अनेक गोष्टी समोर येतात. जस की हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या कारभाराविषयी अनेक गोष्टी पुढे आल्या. अर्थात यातल काय खर आणि काय खोट, हे संबंधित यंत्रणा निश्चित करतील. ती प्रक्रिया अजून पूर्णपणे झालेली नाही. पण यात गुंतवणूकदारांच जे नुकसान आजघडीला झालेल दिसतय ते तर नक्कीच नाकारता येणार नाही.
सेक्टरल आणि अर्थव्यववस्थेसंबंधीची रिस्क
बर, ही रिस्क एखाद्या कंपनीपुरतीच मर्यादित असते, असेही नव्हे. एखादी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि तिच्या अंतर्गत करभारातही काही गडबड नाही, असे गृहीत धरू. मात्र अशा वेळी देखील सेक्टरल रिस्क देखील अस्तित्वात असते. आता गेल्या वर्षीचेच बघा. सेमीकंडक्टरचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी इलेक्ट्रिक व्हेईकल आणि संबंधित उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांसामोर आव्हान निर्माण झाले होते. याठिकाणी एखादी कंपनी कितीही मजबूत दिसत असली तरी असा सेक्टरल क्रायसिस निर्माण झाल्यावर ती कंपनी तरी काय करणार?
यापुढेही जाऊन एक व्यापक इकॉनॉमीची रिस्क अस्तित्वात असतेच. अगदी अलीकडे कोविडमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली. याचा परिणाम पूर्ण बाजारवरच झाला नव्हता काय? किवा आता जागतिक मंदीचे जे आव्हान आहे त्याचा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, असे तज्ञ सांगत आहेतच. हा परिणाम किती तीव्र असू शकतो, याविषयी मतभिन्नता जरूर आहे, मात्र त्याची काही ना काही झळ भारतालाही बसू शकते, असे अनेक अर्थतज्ञ सांगत आहेत. अंतिमत: शेअर बाजार या संगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार म्हणून या सगळ्याचा विचार करणे आवश्यक ठरते. आणि असा विचार करून जर कुणी म्हणतो आहे की, शेअर्स किवा म्युच्युअल फंडमध्ये मला गुंतवणूक करायची नाही, तर तो त्याचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. अशा स्थितीत त्याच्या financial literacy वर प्रश्न उपस्थित करण्याचे काय कारण?
मात्र, हे सगळ म्हणत असताना एक गोष्ट अशीही लक्षात घ्यायला हवी की, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजे पैसाच पैसा. त्यात रिस्क अजिबातच नाही असे म्हणणे जसे एकांगी ठरते तसेच, शेअर मार्केट म्हटले म्हणजे पैसे बुडालेच समजा, असे म्हणणे देखील एकांगीच होय. हे कसे काय? चला बघूया.
मग, शेअर बाजार, म्युच्युअल फंड वाईटच आहेत का?
याचे देखील एका शब्दात उत्तर द्यायचे तर ते म्हणजे, ‘नाही!’ पण, हे कस ते थोड विस्ताराने समजून घेण आवश्यक आहे.
शेअर्समध्ये अनेक जण गुंतवणूक करतात आणि त्यांना फायदा होतो, हे तर तुम्ही बघितले किवा अनुभवलेही असाल. कधी कधी उलटही होत. तुम्ही शेअर्स खरेदी करता आणि त्यांच्या किमती घसरायला सुरुवात होते. पण, जर ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर भविष्यात पुन्हा ती आपल्या योग्य भावात येण्याची शक्यता जरूर असते. अस प्रत्येक कंपनीच्या बाबतीत म्हणता येणार नाही की, ही फंडामेंटली स्ट्रॉंग आहे पण कारभारात काहीतरी गडबड आहे! तसेच सेक्टरल समस्या निर्माण झाली तरी तीही कायमस्वरूपी असतेच असे नव्हे! आणि जेव्हा एखाद्या व्यापक प्रश्नामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर संकट कोसळते आणि शेअर बाजारात घसरण होते, तेव्हा त्यावेळची ती परिस्थिती देखील कायमस्वरूपी राहिलेली बघायला मिळत नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर 90 च्या दशकात निर्माण झालेल हर्षद मेहता प्रकरण, 2008 ची मंदी, 2020 मध्ये कोविड 19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती या सगळ्यात शेअर बाजाराची केवढी मोठी पडझड झाली होती. पण यातून बाजार सावरला की नाही? त्यावेळी निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती अशीच राहिली की बदलली? याचे उत्तर तेव्हाचा आणि आजचा सेन्सेक्स बघितला तर मिळून जाईल.
बऱ्याच ट्रेडर्सकडून तुम्ही हे वाक्य कधीतरी ऐकले असेल. “इन्सान हो या शेअर मार्केट आखिर जाना तो उपर ही है”
यावरुन असे म्हणता येते की, दीर्घ कालावधीचा विचार करून गुंतवणूक केली तर शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विशेषत: यातले इक्विटी म्युच्युअल फंड हे अंतिमत: जास्त परतावा देताना दिसतात. लॉन्ग टर्मममध्ये इन्वेस्टमेंट केल्यामुळे यात नुकसान झाले तरी ते भरून काढले जाऊन नफा मिळायला अवकाश उपलब्ध होतो. तरीही यात वर स्पष्ट केलेल्या रिस्क अस्तित्वात असतात, हेदेखील विसरुन चालत नाही.
महागाईवर मात करण्याचा विचारही महत्वाचा
यात महागाईचा मुद्दा देखील विचारात घ्यावा लागतो. एफडी किवा पीपीएफ सारख्या पेन्शन स्कीम या सुरक्षित परतावा या दृष्टीने निश्चितच चांगल्या आहेत. परंतु, त्या एकतर महागाईसोबत चालतात किवा संपत्तीत किरकोळ वाढ करतात. वाढ झालेली दिसली तरी ती महागाईचा विचार करता जास्त नसते. पण चांगल्या शेअर्समध्ये किवा मुच्युअल फंडात केलेली गुंतवणूक ही लॉन्ग टर्ममध्ये तुमच्या संपत्तीत चांगली वाढ करताना दिसते. अर्थातच यासाठी जोखीम घेण्याची किती तयारी आहे आणि यात नुकसान झालेच तर ते किती तुम्ही सहजपणे पचवू शकता, हे पाहणे देखील महत्वाचे ठरते.
थोडक्यात, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत नाहीत म्हणून कुणाला आर्थिक निरक्षर ठरवण्याचे काही कारण नाही. तसा अधिकारही कुणाला नाही. पण आपल्या क्षमतेप्रमाणे जोखीम पत्करायची असेल आणि जास्त प्रमाणात रिटर्न मिळवायचे असतील तर त्यासाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हे प्रभावी असे पर्याय म्हणून ओळखले जातात. पण, केवळ फारशी माहिती नाही म्हणून या प्रकारच्या गुंतवणूकीपासून दूर राहत असाल तर आता तो प्रश्न नाही. कारण ‘महामनी’ने मराठी भाषेत ही सर्व माहिती तुमच्यासमोर आणली आहे. आणखी अधिकाधिक प्रमाणात रोजच्या रोज आणत आहे. यामुळे या सर्व प्रकारच्या गुंतवणूकीविषयी आवश्यक ती माहिती एकाच ठिकाणी मिळवणे तुम्हाला सोईचे ठरेल.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही. )