चीनमधील उत्पादन कमी करण्याची तयारी अॅपलने सुरु केली आहे. iPhone पाठोपाठ iPad चे उत्पादन देखील भारतात सुरु करण्याबाबत अॅपलचे व्यवस्थापन अनुकूल आहे. भारतात अॅपलच्या उत्पादनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. iPad चे स्थानिक पातळीवर उत्पादन घेतले तर किंमत कमी राहील आणि त्याचा फायदा विक्री वाढण्यास होणार आहे.
अॅपलने चीनमधील iPad चे किमान 30% उत्पादन भारतात हलवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मात्र कंपनीकडून यावृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतीयांमध्ये आयफोन आणि आयपॅडची क्रेझ वाढत आहे. सीएमआरच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत आयपॅडच्या विक्रीत 34% वाढ झाली. जवळपास दोन लाख आयपॅड दुसऱ्या तिमाहीत भारतात विकले गेले. यामुळे कंपनी भारतीय बाजारपेठेबाबत प्रचंड आशावादी आहे.
अॅपल आयपॅड (Gen g) आणि आयपॅड एअर 2022 या दोन आयपॅड मॉडेल्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. iPhone 14 या नव्या आयफोनची निर्मिती भारतात झाली होती. आयफोन प्रमाणे आयपॅडचे भारतात उत्पादन सुरु केल्यास कंपनीला स्मार्टफोन्सच्या प्रिमीयम सेगमेंटमध्ये आघाडी घेणे सोपे होणार आहे.
अॅपल कंपनीसाठी आयफोन आणि आयपॅडची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात गुंतवणूक केली आहे. येत्या 2025 पर्यंत एकूण आयफोन उत्पादनापैकी भारतात 25% उत्पादन करण्याचे अॅपलचे उद्दिष्ट आहे. अॅपलचे पुरवठादार विस्ट्रोन आणि पेगाट्रोन या दोन कंपन्या देखील भारतात विस्तार करत आहेत. चीनमधील अवलंबित्व कमी करुन भारतात उत्पादन वाढीवर भर देण्याची अॅपलची रणनिती आहे.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, आयफोन उत्पादनाला फटका
फॉक्सकॉनकडून आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी 70% फोन्सची निर्मिती केली जाते. चीनमधील झेंग्झू प्रांतात फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे, मात्र कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव झाल्याने या प्रकल्पातील हजारो कामगारांनी घरची वाट धरली आहे. कामगारांना थांबवण्यासाठी फॉक्सकॉनकडून 1400 डॉलर्सचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कामगारांचे पलायन थांबवण्यात कंपनीला अपयश आले. दररोज हजारो कर्मचारी प्लान्ट सोडून पलायन करत आहे. कामगारांना रोखण्यासाठी कंपनीने बळाचा वापर केला आहे.