ipad and Macbook Manufacturing : अॅपलकडून भारतामध्ये लवकरच 25 टक्के आयफोनची निर्मिती करण्यात येणार आहे. आयफोन सोबतच अॅपल आयपॅड आणि मॅकबुकची निर्मिती करणार असल्याची बातमी गेल्या वर्षी अनेक माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे बाजारात चांगलेच आनंदाचे वातावरण होते. मात्र, केंद्र सरकारच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे (Productive Linked Incentives - PLI) अंतर्गत भारतात आयपॅड आणि मॅकबुकची निर्मिती करण्यास नकार कंपनीने दिला आहे.
मात्र, या योजनेमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नवीन सुधारणांमुळे अॅपल कंपनी आपल्या निर्णयावर पुर्नविचार करेल. तसेच आयफोनप्रमाणे आयपॅड आणि मॅकबुकची निर्मिती सुद्धा अॅपल भारतात सुरू करेल, असा विश्वास भारत सरकारने व्यक्त केला आहे.
काय आहे पीएलआय योजना
विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादन वाढावे, आयातीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी परदेशी किंवा देशांतर्गत कंपन्यांना सरकारकडून विविध प्रोत्साहन दिले जाते. ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियाना अंतर्गत केंद्र सरकारने 2020 साली ही योजना सुरू केली. सुरूवातीला या योजनेमध्ये इलेक्ट्रिक वस्तु, औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश होता. मात्र, कालांतराने या योजनेमध्ये ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, टेलिकॉम, सोलार, विशेष प्रकारचे पोलादी वस्तु अशा विविध 13 क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत परदेशी किंवा भारतातील स्थानिक कंपनी सुद्धा भारतात उत्पादन घेत असेल तर सरकारकडून 4-6 टक्के इनसेंटिव्हज (Incentives) दिले जातात.
केंद्र सरकारचे मत
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या एका पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले होते की, आजमितीला अॅपल कंपनी भारतामध्ये 5 ते 7 टक्के उत्पादन भारतात घेत आहे. आगामी काळात हे 25 टक्क्यापर्यंत उत्पादन भारतात घेण्याचा अॅपल कंपनीचा मानस आहे.
अॅपलचे उत्पादन
भारतामध्ये 2017 पासून अॅपलच्या आयफोन या प्रोडक्टची निर्मिती केली जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण हे कमी असून आयफोनच्या जून्या मॉडेल्सचा या मध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी आयफोनने त्यांचा फ्लॅगशिप प्रोडक्ट आयफोन 14 भारतामध्ये असेंबल करण्यास सुरूवात केली. तसेच लवकरच चैन्नई येथे सुरू होणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून सुद्धा 25 टक्के आयफोनची निर्मिती करणार आहे.
आजमितीला भारतामध्ये मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये अॅपल कंपनीचा 5 टक्के वाटा (शेअर) आहे. भविष्यात ही भारतात चांगली बाजारपेठ असल्याने अॅपल कंपनी आपल्या विविध प्रोडक्टच्या निर्मितीसाठी भारताला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे.