MHADA LOTTERY 2023: मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं, असं स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने एक खुशखबर आणली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) जाहिरात प्रसिद्ध होणार असून उद्यापासून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
कोकण मंडळाने तीन महिन्यांपूर्वीच 4,654 घरांसाठी सोडत काढली होती. पण यातील बरीच घरे विकली न गेल्याने म्हाडाने या शिल्लक राहिलेल्या घरांसह नवीन घरांचा समावेश करून आता 5,309 घरांसाठी जाहिरात आणत आहे. यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे.
उद्या जाहीर होणाऱ्या या घरांच्या सोडतीचा निकाल नोव्हेंबरमध्ये काढला जाणार आहे. यामध्ये 20 टक्के सर्वसमावेश योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि पंतप्रधान आवास योजना अशा योजनांमधील घरे असणार आहेत.
MHADA Registration Process
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. पण अर्ज करण्यापूर्वी संबंधितांना म्हाडाची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगोदरच पूर्ण केली असेल तर पुढील अर्ज व्यवस्थितपणे भरता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरण्यापूर्वी करावी लागणारी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी पार पाडायची.