टीव्हीवरील स्पोर्ट्स प्रसारणा (Live Sports) ऐवजी मोबाईल अॅपवर खेळांचं प्रसारण पाहणाऱ्यांची संख्या वाढतेय. आणि यात अर्थातच तरुणाई आघाडीवर आहे. हे लक्षात घेऊन अॅमेझॉन (Amazon.com) या अमेरिकन कंपनीने सुरुवातीला निदान अमेरिकेत स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अॅप सुरू करायचं ठरवलंय. अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) हे मनोरंजनात्मक अॅप सध्या अस्तित्वात आहेच.
अॅमेझॉन प्राईम या अॅपवर व्हीडिओ आणि संगीतविषयक कार्यक्रम आहेत. आणि इथून अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स (E-Commerce) साईटवरही चांगला ट्राफिक येतो. आणि लाईव्ह कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ट्राफिक आणि प्रोग्रामिंग उद्योगातही वाढ होईल, असं कंपनीला वाटतंय.
अॅमेझॉन कंपनीकडे युकेमध्ये नॅशनल फुटबॉल लीग अंतर्गत गुरुवारी रात्री होणाऱ्या फुटबॉल फ्रँचाईजी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. आता स्पोर्ट्स प्रसारणाच्या डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हॉटस्टार डिस्ने या कंपनीला टक्कर द्यायची तयारी अॅमेझॉनने चालवली आहे. पण, या स्पर्धेत ते एकटे नाहीएत. गुगलची मालकी असलेल्या युट्यूबनेही सामन्यांच्या लाईव्ह प्रसारणाची तयारी आधीच सुरू केलीय.
युट्यूबकडे अमेरिकेतल्या NFL च्या अमेरिकेत रविवारी होणाऱ्या फुटबॉल सामन्यांचे हक्कं आहेत. अॅमेझॉन स्पोर्ट्स अॅप नेमकं कधी बाजारात येणार याची तारीख अजून ठरलेली नाही. कंपनीने अधिकृतपणे कुठलीच माहिती दिलेली नाही. पण, सध्या त्यांचं लक्ष कंपनीच्या तोट्यात चालणाऱ्या प्रकल्पांवर उपाययोजना करण्याकडे आहे. त्या दृष्टीने अशा प्रकल्पांमध्ये नोकर कपात करण्याचंही त्यांनी ठरवलं आहे.