ट्विटरने भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना कमी केल्याची बातमी ताजी असतानाच आता ॲमेझॉन इंडियामधील हजारो भारतीय कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ॲमेझॉन इंडियाने भारतातून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे संकेत दिले आहेत.
जगातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी कपात केली जात आहे. अगदी अलिकडचे उदाहरण ट्विटर, मेटा, डिस्ने या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरमधील हजारो कायम स्वरुपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. Amazon India साठी भारतामध्ये 1 लाखाच्या आसपास कर्मचारी काम करत असल्याचा अंदाज आहे. तीव्र स्पर्धेमुळे कंपनीला सध्या सातत्याने वृद्धी करणे अवघड बनले आहे. परिणामी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीला कंपनी व्यवस्थापनाने प्राधान्य दिले आहे.
अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी रडारवर
भारतात होणारी कर्मचारी कपात अभियांत्रिकी आणि इतर विभागांमध्ये असू शकते. तसेक बॅक-ऑफिस आणि किरकोळ ऑपरेशन्समधील कर्मचारी सुद्धा आपल्या नोकऱ्या गमावू शकतात.
याआधी Amazon.com Inc या आठवड्यापासून 10,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे, असे वृत्त होते. न्यूयॉर्क टाइम्सने याविषयीचे वृत्त दिले होते. यानुसार, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 3 टक्के कपात होऊ शकेल. यात भारतातील ही संख्या किती असेल याविषयी निश्चित अंदाज नसला तरी काही शेकड्यांमध्ये ही कपात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
याबबात यापूर्वीच कंपनीने स्पष्ट केले होते की ते पुढील काही महिन्यांसाठी कॉर्पोरेट कर्मचार्यांची नियुक्ती करणार नाही.
बड्या टेक कंपन्यांची नोकर कपात
अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपातीच्या योजना आखत आहेत. गेल्याच आठवड्यात मेटा (फेसबूक) प्लॅटफॉर्म इंककडूनही भविष्यात कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. खर्च कमी करण्यासाठी 11 हजारपेक्षा जास्त नोकऱ्या किंवा 13 टक्के कर्मचारी मेटा कमी करेल, असे सांगण्यात आले होते. अलिकडे वॉल्ट डिस्ने कंपनीने देखील नियुक्ती गोठवण्याची आणि काही नोकर्या कमी करण्याची योजना आखली होती.