हिंदू धर्मियांसाठी अक्षय्य तृतीया हा वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेला शुभ दिवस आहे. या दिवशी सर्वसाधारणपणे पंचाग किंवा विशिष्ट वेळ/मुहूर्त न पाहता शुभ कामे केली जातात. अक्षय्य तृतीयेच्याि दिवशी लग्नकार्य, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन ऑफिसची सुरुवात आणि घराची-गाडीची खरेदी यासारखी शुभ कामे केली जातात. याव्यतिरिक्त अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू विशेषत: सोन्याच्या वस्तू या दीर्घकाळ टिकतात किंवा त्यात दिवसेंदिवस वाढ होत राहते, अशी लोकांची भावना आहे. तर हा सोने खरेदीला प्रोत्साहन देणारा अक्षय्य तृतीया हा दिवस शनिवार दि. 22 एप्रिल रोजी आहे.
सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक
परंपरेनुसार आणि शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो, असे सांगितले जाते. सोने खरेदी करणे हे नेहमीच फायद्याचे ठरू शकते. कारण सोने या धातुला जगभरात मान्यता आहे आणि त्याचे मूल्य सगळीकडे मौल्यवान असेच आहे. तसेच अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून त्यावर रोख रक्कम मिळवता येते. गेल्या 10 वर्षांतील सोन्याच्या किमतीचा विचार करता त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली. 2013 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 26,867 रुपये होती. ती आता 62 हजार रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर सोन्याला हिंदु संस्कृतीत खूप महत्त्व दिले गेले आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोन्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. यामुळे सोन्याला सर्वमान्यता असून त्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
पुराणातही सोन्याला विशेष महत्त्व
धार्मिक आचरणानुसार आणि परंपरेनुसार सोन्याचे अनेक फायदे सांगितले जातात. जसे की, सोने हे धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. हा अत्यंत मौल्यवान धातू असल्याने याचा बाजारातील भाव नेहमी वधारलेला असतो. सोने हा अक्षय्य धातू मानला जातो. म्हणजे जो कधीच नष्ट होत नाही. सोन्याच्या खरेदीने संपत्तीत वाढ होते. सोन्याला शक्तीचे प्रतिक ही मानले जाते. आयुर्वेदामध्ये सोन्याच्या अंशाला बुद्धिवर्धक मानले गेले आहे. त्यामुळे सोन्याचा दागिना उकळवून त्याचे पाणी पिणे किंवा सोन्याचा अंश असलेले सुवर्णप्राशन, सुवर्णभस्म याचे सेवन केले जाते.
सोन्याचे भाव वाढलेले
2022 मध्ये रशिया आणि युक्रेन यो दोन देशांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात महागाईचा भडका उडाला होता. तो अद्याप कमी झालेला नाही. जागतिक पातळीवर अजून महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ही वाढतच चालली आहे. अशावेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अक्षय्य तृतीया किंवा कोणत्याही सणानिमित्त सोने खरेदी करणे ही परवडणारी गोष्ट राहिलेली नाही. पण तरीही परंपरा आणि धार्मिक गोष्टींना अनुसरून लोक किमान सोने विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात.
प्रत्यक्ष सोन्याऐवजी पेपर गोल्डचा पर्याय
पण ज्यांना प्रत्यक्ष सोने खरेदी करता येत नाही. त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध आहे. ते प्रत्यक्ष सोने खरेदी करू शकतात. पण ज्यांच्याकडे एकत्रित रक्कम नसेल ते गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund), गोल्ड ईटीएफ (Gold ETF) आणि सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond) या पर्यायांचा वापर करून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड फंडमध्ये तर एसआयपीद्वारे (SIP) कमीतकमी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)
गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेला निधी हा फंड मॅनेजर सोन्याच्या खाणी, ज्वेलर्स कंपन्या, गोल्ड फॅब्रिकेशन आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये सहभागी असलेल्या लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्यांच्या कामगिरीवर गोल्ड फंडची कामगिरी ठरते.
गोल्ड ईटीएफ (Gold ETF)
गोल्ड म्युच्युअल फंडप्रमाणेच गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund) हा एक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफमध्ये जमा होणारा निधी हा 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या व्यवसायात गुंतवला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड (सुवर्ण रोखे) इश्यू केले जातात. या बॉण्ड्सला सरकारची हमी असून एका आर्थिक वर्षात प्रति व्यक्ती कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते. यावर 2.5 टक्के व्याज मिळते. तसेच याचा लॉक इन कालावधी 5 वर्षे असतो.
प्रत्यक्ष सोन्याची किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे हा पर्याय सर्वांनाच उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे पुरेशी एकत्रित रक्कम उपलब्ध नाही; त्यांच्यासाठी पेपर गोल्ड हा पर्याय किफायतशीर ठरू शकतो.