Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी? कोणते पर्याय लाभदायक आहेत! Gold Investment

सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी? कोणते पर्याय लाभदायक आहेत! Gold Investment

युद्धामुळे संपूर्ण जगावर अनिश्चिततेचे सावट आहे. परिणामी शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, क्रुड ऑईलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूक कुठे आणि कशी करावी असा प्रश्न पडतो. अशावेळी लोक सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानतात.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukraine crisis) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. यामुळे क्रुड ऑईल (crude oil) आणि सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्याच्या (Gold) भावातही वाढ दिसून येतेय. या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सुरक्षित गुंतवणूक कशात करावी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. सध्या तरी तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सोन्यात गुंतवणूक करा. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 15 ते 20 टक्के गुंतवणूक ही सोन्यात करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आपल्याकडे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्याची सवय आहे. सणांच्या किंवा एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने आवर्जून सोन्याची खरेदी केली जायची. त्यामागचा उद्देश गुंतवणूक हाच होता. आजही सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आता तर सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय ही उपलब्ध झाले आहेत. युद्धामुळे शेअर मार्केट, क्रुड ऑईल आणि क्रिप्टोकरन्सीवर अनिश्चिततेचे सावट पसरलेले असताना तुमच्याकडे सोन्यातील गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष सोने खरेदी (Physical Gold), गोल्ड ईटीएफ (Gold ETF), गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund), सोव्हेरन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond), डिजिटल गोल्ड (Digital Gold) हे पर्याय उपलब्ध आहेत.

gold investment

प्रत्यक्ष सोने खरेदी (Physical Gold)
प्रत्यक्ष सोने खरेदी करणे, हा गुंतवणुकीचा साधासरळ आणि सोपा प्रकार आहे. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षांपासून आपण अशाप्रकारे गुंतवणूक करत आलो आहे. इथे तुम्ही सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉईन किंवा सोन्याचे बिस्किट खरेदी करू शकता. ग्रामीण भागातील काही कुटुंबांमध्ये पूर्वी शेतातील पीक विकल्यानंतर आलेल्या पैशातून सोन्याची खरेदी केली जात होती. अगदी थोडे सोने विकत घेतले तरी ती कुटुंबाची गुंतवणूक  असायची. जेव्हा सोन्याचे भाव कमी असतात. त्यावेळी सोने खरेदी करायचे आणि जेव्हा भाव वाढतात त्यावेळी विक्री करायची. यातून चांगला नफा मिळतो.

गोल्ड ईटीएफ (Gold ETF) 
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ. गोल्ड ईटीएफमध्ये प्रत्यक्ष सोने विकत घेण्याऐवजी सोने युनीटमध्ये विकत घ्यायचे. म्हणजे जितके ग्रॅम सोने विकत घ्यायचे आहेत तितके युनीट आपल्याकडे जमा होतात. गोल्ड ईटीएफमध्ये डिमॅट खात्याद्वारे गुंतवणूक करू शकतो. यात किमान एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करावी लागते. शेअर मार्केटप्रमाणेच गोल्ड ईटीएफच्या किमतीतही चढउतार होत असतात. विकत घेतलेले गोल्ड ईटीएफचे युनीट आपण केव्हाही विकून त्यातून नफा कमावू शकतो.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)
गोल्ड म्युच्युअल फंड हा सर्वसाधारण म्युच्युअल फंडसारखाच प्रकार आहे. गोल्ड म्युच्युअल फंडद्वारे सोन्यात गुंतवणूक केली जाते. या फंडमध्ये आपण एसआयपी (Systematic Investment Plan) च्या माध्यमातूनही गुंतवणूक करू शकतो. आपण जितक्या पैशांची गुंतवणूक करू तितके युनीट आपल्याला मिळतात. गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खात्याची आवश्यकता नसते. याशिवाय गोल्ड फंडमध्ये एसआयपीद्वारे कमीतकमी 500 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता.

सोव्हेरन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)
सोन्यातील गुंतवणुकीचा हा सर्वात सुरक्षित आणि खास पर्याय समजला जातो. सोव्हेरन गोल्ड बॉण्डची विक्री केंद्र सरकारच्यावतीने रिझर्व्ह बॅंकेद्वारे होत असल्यामुळे ती अतिशय सुरक्षित मानली जाते. यात किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलो सोन्याची गुंतवणूक करू शकतो. या बॉण्डचा कालावधी 8 वर्षांचा असून यातील लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. 5 वर्षांनंतर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. याशिवाय दरवर्षी गुंतवणूकीवर 2.5 टक्के व्याज तुम्हाला दिले जाते.

डिजिटल गोल्ड (Digital Gold)
डिजिटल गोल्ड इनव्हेस्टमेंट हा गुंतवणुकीची सर्वोत्तम प्रकार आहे. यातील गुंतवणूक हीदेखील पेपरलेस असते. म्हणजे प्रत्यक्ष सोने सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागत नाही. गुगल पे, फोन पे यासारखे युपीआय अॅपदेखील डिजिटल गोल्ड गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देतात. नॅशनल स्पॉट एक्सचेंजच्या डिलरमार्फतही ही गुंतवणूक करता येते.