सध्या देशभरात नवरात्रीची धूम आहे. सणासुदीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. सोन्याची वाढती मागणी लक्षात घेता ऐन नवरात्रीत सोन्याचे भाव वाढले आहेत. देशभरातील महत्वाच्या शहरात सोन्याचा भाव 60 हजारांच्या वर गेलेला पाहायला मिळतो आहे.
नवरात्रीत आणि दसऱ्याच्या आधीच सोन्याचे भाव कडाडले असल्यामुळे दसरा आणि दिवाळी येईपर्यंत सोन्याचे भाव आणखी वाढतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम
सध्या इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरूं असलेल्या युद्धाचा परिणाम जाग्रील बाजारपेठेवर पाहायला मिळतो आहे. गेल्या काही आठवड्यापासून भारतीय शेअर मार्केट देखील सुमार कामगिरी करताना दिसत आहे. याचाच परिणाम आता सोन्याच्या भावावर देखील पाहायला मिळतो आहे.
युद्धजन्य परिस्थितीत सोन्याच्या खरेदीकडे नागरीकांचा कल अधिक असतो. युध्दकाळात सोन्याला कुठलेही नुकसान पोहोचत नाही. एक सुरक्षित संपत्ती (Safe Asset) म्हणून सोन्याकडे बघितले जाते. सोने मोडले, तुटले, वितळले तरीही त्याचे बाजारमूल्य मात्र संरक्षित असते, ग्राहकांना त्यामुळे फारसे नुकसान सहन करावे लागत नाही. या कारणामुळे गेल्या काही आठवड्यापासून आशिया खंडातील देशांमध्ये सोन्याला मागणी वाढली आहे.
मागणी वाढली, पुरवठा मंद गतीने
देशातील सर्वच शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात जवळपास 700 ते 1000 रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. युद्धाचा परिणाम आणि सणासुदीचे दिवस यामुळे देशात सोन्याची मागणी वाढली आहे. भारतात सोने आयात करावे लागते, त्यामुळे पश्चिम आशियात उद्भवलेल्या युद्ध परिस्थितीमुळे सोन्याची आयात देखील मंद गतीने सुरु असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,000 रुपयांच्या वर तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,100 रुपयांच्या वर पोहोचला आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 55,100 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,110 रुपये नोंदवला गेला आहे.जयपूर आणि गुरूग्राम शहरात सोन्याचे भाव अधिक महागले असून इथे 22 कॅरेट सोन्याचा दर 55,250 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,260 रुपये नोंदवला गेला आहे.
चांदी देखील महागली
एकीकडे सोन्याचे दर गगनाला भिडले असताना चांदी देखील महागली आहे. गेल्या काही आठवड्यात चांदीचा दर प्रतिकिलो 1000 रुपयांनी महागला आहे. आज देशभरातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा भाव 74,100 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
सोन्याप्रमाणेच चांदी खरेदीला देखील भारतीय परंपरेत स्थान आहे. सणासुदीच्या काळात चांदीची आभूषणे, देव देवतांच्या मुर्त्या, पूजेचे सामान खरेदी करण्यात भारतीय ग्राहकांची आघाडी असते.