भारतात सोने खरेदीची चांगलीच क्रेझ आहे. भारतीयांना सोन्याची आभूषणे वापरण्याची पूर्वापार आवड आहे. सोन्याला धार्मिक अधिष्ठान देखील प्राप्त आहे. दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढत आटणा त्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. सध्या दिवाळी सण आणी येऊ घातलेली लग्नसराई तोंडावर आलेली असताना सोन्याचे भाव 61 हजार रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.
चांदीला वाढती मागणी
सध्या देशातच नाही तर जगभरात चांदीला देखील मोठी मागणी आहे. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर देशात चांदीचा भाव 75 हजार रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या 5 वर्षात चांदीच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. जगभरात चांदीची मागणी अचानक कशी वाढली याबद्दल जाणकारांनी अनेक तर्क वितर्क लावले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या लेखात.
आभूषण, गुंतवणूक पर्याय
सोन्याची आभूषणे भारतीयांचा आवडीचा विषय आहे. वेगवेगळ्या कलाकुसरीचे दागिने भारतीय महिला खरेदी करतात. गुंतवणुकीचा एक सोपा पर्याय म्हणूनही सोने खरेदीकडे बघितले जाते. ज्या ग्राहकांना सोने खरेदी परवडत नाही असे ग्राहक चांदी खरेदीचा मार्ग अवलंबताना दिसतात.
चांदीची आभूषणे, चांदीचे बार, देवादिकांच्या मूर्ती आणि भांडी खरेदी करण्याची क्रेझ भारतीयांमध्ये आहे. नव्या ट्रेंडनुसार चांदीची आभूषणे युवावर्ग वापरताना दिसत आहेत. याशिवाय प्लॅटिनम कोटेड (Platinum Coated) सिल्वर ज्वेलरी देखील सध्या मोठ्या प्रमाणात विकली जाते आहे. अशाप्रकारच्या नवनव्या ट्रेंडमुळेही चांदीची मागणी वाढली आहे असे जाणकार सांगतात.
औद्योगिक वापर
सध्या चांदीचा वापर आभूषणापुरता मर्यादित नाहीये. औद्योगिक क्षेत्रातही चांदीला मोठी मागणी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चांदीचे गुणधर्म. चांदी हा धातू विजेचा चांगला वाहक आहे. याच गुणधर्मामुळे चांदीला औद्योगिक क्षेत्रात मोठी मागणी आहे. 5 जी तंत्रज्ञानात देखील चांदीचा वापर केला जातो आहे.