प्रवासी विमान वाहतूक सेवा व्यवसायात नव्यानेच पदार्पण केलेल्या आकासा एअरलाइन्सने सरत्या वर्षाचे औचित्य साधून तिकिटावर मोठी सूट देऊ केली आहे. 11 शहरांतून देशांतर्गत प्रवास करण्यासाठी 10% सूट देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. #YearEndSale असा हॅशटॅग कंपनीने तयार करत ट्विटरवरुन या ऑफरची माहिती दिली आहे.
12 डिसेंबरच्या आधीच बुक करावे लागणार तिकीट
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना 12 डिसेंबरच्या आत तिकीट खरेदी करावे लागणार आहे. 6 डिसेंबरला रात्री 12:00 वाजता ही ऑफर सुरू होणार असून 12 डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर तिकीट बुक करणाऱ्यांना या ऑफरचा फायदा घेता येणार नाही. नव वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विमान प्रवासास मोठी मागणी असते. तसेच आकासा कंपनी बाजारात नवीन असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही ऑफर दिली आहे. आकासा एअरच्या दर आठवड्याला सुमारे 450 फ्लाइट 11 शहरांतर्गत सुरू असतात. या सर्व फ्लाइटवर 12 डिसेंबरच्या आत तिकीट बुक केले तर 10% सूट मिळणार आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी "FESTIV10" हा कोड प्रवाशांना वापरावा लागणार आहे.
कोणकोणत्या शहरांतून प्रवासासाठी ऑफर
आकासा विमान सेवा गुवाहटी, अहमदाबाद, आगरतळा, कोची, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, लखनऊ आणि विशाखापट्टणम या शहरात सुरू आहे. या शहरामधून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येईल. बुक केलेले तिकीट हस्तांतरित करता येणार नसेल तसेच पैशाच्या स्वरुपात ऑफरचा लाभ मिळणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आकासा एअरचे मुख्य प्रतिस्पर्धी इंडिगो आणि टाटा समूहाचे एयरलायन्स आहेत. एअर इंडियाच्या विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि टाटा समुहाची 80 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. विमान वाहतूक क्षेत्र हे अतिशय स्पर्धात्मक क्षेत्र आहे. विमान वाहतूक क्षेत्र किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे, यामध्ये तिकिटाच्या किमतीला खूप महत्त्व असते. त्यामुळे, या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी आकासा एअरला तिकिटाच्या किमतीवर भर द्यावा लागणार आहे. सध्या या क्षेत्रातील दिवस फार चांगले नसून सोबतच विमान इंधनाच्या दरांमध्ये देखील वाढ होत आहे. कंपन्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करत आहेत तर क्षमतेचे देखील आव्हान आहे. आकासा एअरचा कदाचित सर्वात मोठा फायदा म्हणजे ते नव्याने सुरू होत आहेत. या कंपनीवर कोणतही दायित्त्व नाही.