Akasa Airline Destination: अकासा कंपनीने शुक्रवारपासून (दि.19 ऑगस्ट) बंगळुरू-मुंबई मार्गावर आपली विमानसेवा सुरू केली. अकासा विमान कंपनीची सेवा 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. सध्या ही कंपनी मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची आणि बंगळुरू-मुंबई या तीन मार्गांवर सेवा देत आहे.
अकासा विमान कंपनीची सप्टेंबर अखेरपर्यंत प्रत्येक आठवड्यात 150 हून अधिक फेऱ्या सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने शुक्रवारी (दि.19 ऑगस्ट) बंगळुरू-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू केली. सध्या बंगळुरू-मुंबई मार्गावर दिवसातून दोन उड्डाणे चालविण्यात येणार आहेत. कालांतराने या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. या नियोजना अंतर्गत, एक अतिरिक्त फेरी 30 ऑगस्टपासून आणि दुसरी 19 सप्टेंबरपासून सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच सप्टेंबर अखेरपर्यंत फ्लाईट्सची संख्या 150 च्या पुढे जाईल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.
दरम्यान, कंपनी 10 सप्टेंबरपासून बंगळुरू ते चेन्नईला जोडणाऱ्या मार्गावरही फ्लाईट सेवा सुरू करणार आहे. कंपनीने आतापर्यंत मुंबई, अहमदाबाद, कोची, बंगळुरू आणि चेन्नई या पाच शहरांसाठी सहा मार्गांवर उड्डाणे जाहीर केली. अकासा एअरलाईन्सकडे सध्या तीन विमाने आहेत. दर दोन आठवड्यांनी एक नवीन विमान जोडण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. यानुसार मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या ताफ्यात 18 विमाने असतील.
खरे तर अकासा कंपनीतील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर या विमान कंपनीचे काय होणार, अशी चर्चा रंगली होती. पण कंपनीने आपल्या प्लॅननुसार काम सुरू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीने नवीन हवाई उड्डाणाची घोषणा करून उधाण आलेल्या चर्चांना लगाम घातला आहे.
Source: Wikimedia