शेअर बाजारात सलगपणे विचार केल्यास गेले 6 दिवस शेअर बाजारात घट बघायला मिळत आहे. गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 59,463.93 वर घसरला आणि निफ्टी 17,465.80 वर बंद झाला आहे. आठवड्याभराचा विचार केला तर बाजार सुमारे 3 टक्के इतका घसरला आहे. शुक्रवारी ऑटो, मेटल आणि बँकिंग स्टॉक बाजारामध्ये सर्वाधिक तोट्यात गेल्याचे बघायला मिळाले.
शेअर बाजारात होत असलेल्या या घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. विश्लेषक या शेअर बाजारातील स्थितीचे विश्लेषण करताना विविध कारणे सांगत आहेत. जागतिक बाजारातील कमकुवतपणा, डॉलर इंडेक्समध्ये तेजी अशी कारणे यामागे सांगितली गेली आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.
ऑटो, रियल्टी आणि एफएमसीजी या शेअर्समध्येही प्रेशर दिसून आले. शुक्रवारच्या ट्रेडमध्ये डिव्हिस लॅबोरेटरीज, अदानी बंदर, आशियाई पेंट्स, कोल इंडिया तेजीत तर त्याच वेळी अदानी एंटरप्राइजेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील यांची निफ्टीमध्ये घसरण झाली. बाजारात विक्रीमध्ये वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. 16 फेब्रुवारी रोजी बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 2.68 लाख कोटी इतके होते. हेच 24 फेब्रुवारी रोजी 2.60 लाख कोटी रुपये इतके कमी झाले आहे. गुंतवणूकदारांना या कालावधीत 8 लाख कोटी गमवावे आहेत.
या पार्श्वभूमीवर या आठवड्यात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात काही वेळा असे देखील दिसून आले की, बाजाराची सुरुवात तर वाढीसह झाली. मात्र हे चित्र बदलत गेले. आणि बाजार बंद होताना तो घसरणीसह बंद झाला होता. अदानी शेअर्सकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठवडाभरातच नव्हे तर गेला महिनाभर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळत आहे. समूहासंबंधी मोठ्या प्रमाणात नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे एखाद दुसरी समूहासाठी दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी एकीकडे शेअर बाजारात काय घडते त्यातही आता अदानी शेअर्स कोणत्या दिशेने जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.