मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते आणि या आर्थिक राजधानीत सुमारे 600 एकर परिसरात आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेत अदानी ग्रुपने बाजी मारली होती. या प्रकल्पाला आता सरकारे अंतिम परवानगी दिली आहे.
अदानी ग्रुपमधील रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचे काम पाहणारी कंपनी अदानी रिअल्टी कंपनीला हे पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. नोव्हेंबर, 2022 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे संपूर्ण अधिकार हे आता अदानी प्रॉपर्टीज या कंपनीला असणार आहेत. राज्य सरकारने यानुसार संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या असून एका आठवड्यात याबाबतचे आदेश जाहीर करण्याच्या सूचन दिल्या आहेत.
अदानी रिअल्टीने 5,069 कोटींची लावली होती बोली
नोव्हेंबर, 2022 मध्ये जेव्हा धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी जागतिक पातळीवरून निविदा मागवल्या होत्या. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांसह जवळपास 8 कंपन्यांनी बोली लावली होती. तेव्हा अदानी रिअल्टीने या प्रकल्पासाठी 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर सरकारने या प्रकल्पातील किमान गुंतवणूक 1,600 कोटी रुपये असल्याचे म्हटले होते.
मुंबईचा चेहरा बदलणार
धारावी पुनर्विकासातून 600 एकरांवर पसरलेली धारावी आणि त्यातील 55 हजारांहून अधिक मालमत्ताधारक/गाळेधारक तसेच 10 ते 12 हजार छोटे-मोठे व्यावसायिक यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामुळे मुंबईतील एका मोठ्या भागाचा संपूर्ण चेहरा बदलणार आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीचा आता जागतिक पातळीवर वेगळा उल्लेख होऊ शकतो. इथल्या जवळपास 56,000 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे, हे अदानी रिअल्टी आणि पुनर्विकास महामंडळासाठी आव्हान असणार आहे. इथल्या लोकांना 405 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत.
Source: www.cnbctv18.com